आरोग्य कर्मचारी बिंधास्त; पीपीई कीटचा वापर घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:39 AM2021-05-10T04:39:35+5:302021-05-10T04:39:35+5:30
सातारा : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचा बिनधास्तपणा दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ...
सातारा : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचा बिनधास्तपणा दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे सध्याचे वातावरण अत्यंत उष्ण असून, यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट परिधान करावेसे वाटत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी पीपीई कीटचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. रोज दोन हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रात्रंदिवस आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, सध्या प्रचंड गर्मी असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. एकदा घातल्यानंतर आठ तास अंगावरच हे कीट असते. त्यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हे कीट घालावे असे वाटत नाही. इतर खबरदारी घेऊन आरोग्य कर्मचारी रुग्णांवर उपचार करीत आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीत डॉक्टर ज्यावेळी वॉर्डांमध्ये रुग्णाला तपासणीसाठी जातात, त्यावेळी बरेच डॉक्टर पीपीई कीट घातलेले पाहायला मिळतात. परंतु रोज वॉर्डमध्ये असणारे परिचारिका, वॉर्डबॉय व इतर कर्मचारी बिनधास्तपणे वाॅर्डमधून इकडून तिकडे वावरत असतात. गतवर्षी जेव्हा कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केला, त्यावेळी जिल्ह्यामध्ये पीपीई कीटची कमतरता होती. मात्र, आता या कीटची कमतरता भासत नाही. मात्र, पहिल्यापेक्षा या कीटला मागणी कमी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट: काय म्हणतात आरोग्य कर्मचारी
वर्षभरापूर्वी जेव्हा कोरोनाची लागण सर्वांना होत होती, त्यावेळी आम्हाला हे कीट मिळत नव्हते. केवळ डॉक्टरच कीट घालत होते. मात्र, आता आम्हाला पीपीई कीट मिळत असले तरी हे पीपीई कीट उष्णतेमुळे घालू वाटत नाहीत. प्रचंड घाम येतो. त्यामुळे काही वेळेला अशक्तपणाही जाणवतो, म्हणून आम्ही सध्या कीट घालत नाही.
- एचडी गायकवाड, आरोग्य कर्मचारी
चौकट : कोरोना वॉर्डांमध्ये मी पीपीई कीट घातल्याशिवाय जात नाही. सध्या उष्णता प्रचंड असल्यामुळे खूप त्रास होतो. मात्र, कोरोना होईल या भीतीने आम्ही या कीटचा वापर करतो. इतरांनाही या कीटचा वापर केला पाहिजे.
-विठ्ठल शेळके, आरोग्य कर्मचारी
कोट : मी आठ दिवसांपासून कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. सकाळी दहा वाजता ज्या वेळेला डॉक्टरांचा राऊंड होतो, तेव्हा डॉक्टर पीपीई कीट घालून आम्हाला तपासणीसाठी येत आहेत. मात्र, त्यांच्या सोबत असलेल्या परिचारिका व इतर कर्मचारी पीपीई कीट घालत नाहीत.
सूरज जाधव, कृष्णानगर सातारा
चौकट: काय म्हणतात डॉक्टर
खरंतर जेव्हा पेशंट तपासण्याची वेळ येते, त्यावेळी पीपीई कीट घालणे आवश्यकच असते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता काहीजण कीट घालत नाहीत. अनेकजण फार उकडतंय अशी तक्रार करतात. त्यामुळे या पीपीई कीटकडे फारसे कोणी गांभीर्याने पाहत नाही.
एक डॉक्टर, कऱ्हाड
कोट : माझ्या ड्युटीवेळी मी कंपल्सरी पीपीई कीट घालूनच कोरोना वॉर्डामध्ये प्रवेश करतो. हे कीट अत्यंत सुरक्षित असे आहे. खरं तर कोरोना वॉर्डांमध्ये पीपीई कीटशिवाय प्रवेश केलाच नाही पाहिजे. सूक्ष्म विषाणू कोठेही असू शकतात. त्यामुळे हे कीट आवश्यकच आहे.
एक डॉक्टर, सातारा
कोट : साताऱ्यातील जम्बो कोरोना सेंटरमध्ये मी १५ दिवसांपूर्वी उपचार घेत होतो. त्यावेळी वॉर्डमध्ये सर्वजण पीपीई कीट घालूनच येत होते. काही परिचारिका मात्र पीपी कीट न घातलेल्या दिसून येत होत्या. डॉक्टर मात्र पीपीई कीट घालूनच येत होते.
सदाशिव माने, सातारा
चौकट :
जिल्ह्यातील कोविड-१९ सेंटर - १७
डॉक्टर - ३४४
कर्मचारी - ५८७
कोविडवर उपचार केले जाणारे रुग्णालय - ६८
डॉक्टर - २३६९
कर्मचारी - ८९२६