पळशी : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून, कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन व कर्मचारी वेगाने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल माजी आमदार सदाशिवराव पोळ स्मृती प्रतिष्ठानने घेत मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांना ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पोळ, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. भुजबळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पोळ, डॉ. साजिश शहा, डॉ. अनिल बोराटे, डॉ. हेमंत जगदाळे, डॉ. सुहास घोरपडे, डॉ. महेश माने, आदी उपस्थित होते.
शासन स्तरावर अनेक निर्बंध घालून कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच गाव पातळीवर स्थानिक प्रशासन काम करत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक जाणवत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी व पोलीस विभाग स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. हे काम करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याचवेळी प्रतिष्ठानने केलेल्या या सन्मानामुळे सर्वजण भारावून गेले.