महाबळेश्वर : राज्यात एकीकडे उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर जोरदार सरी बरसल्याने पर्यटकांसह विक्रेत्यांची एकच धांदल उडाली.
सातारा जिल्ह्याचा पारा ३८ अंशांवर पोहोचला असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात देखील आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गुरुवारी दुपारी येथील वातावरणात अचानक बदल झाला. आभाळ ढगांनी व्यापून आले. यानंतर सायकाळी साडेचार वाजता अवकाळीने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाºयासह झालेल्या या पावसामुळे येथील रस्ते जलमय झाले. नाले देखील तुडुंब भरून वाहिले. या पावसामुळे पर्यटकांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. पावसानंतर हवेत कमालीचा गारवा पसरल्याने या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला.