सातारा - साताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी (20 नोव्हेंबर) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. माण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत.
माण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, दहिवडी, वावरहिरे, डंगीरेवाडी, शेवरी, दानवलेवाडी, हस्तनपूर, बिजवडी, पांगरी, बिदाल, शिंदी, वारुगड, मलवडी, कुळकजाई या ठिकाणी पाऊस पडत आहे.
गेली वर्षभर शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहात होता. अनेक ठिकाणी पेरणी झाली नव्हती. पेरणी झाली होती तेथील पिके जळून चालली होती. या पावसामुळे जनावरांचा चारा प्रश्न थोडा फार मिटू शकतो. गावोगावचे बंधारे भरल्याने शेतकरी सुखावला आहे. म्हसवडपासून कळसकरवाडीपर्यंत अनेक वर्षांनंतर पाऊस पडत आहे.
वीटभट्टी चालकांचे नुकसान
फलटणसह मलटण, सुरवडी, नांदल, भिलकटी, वडजल, काशीदवाडी, परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरवडी परिसरातील काही वीटभट्टी चालकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. कच्च्या विटा भिजल्यामुळे अण्णा दगडू माडकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.