सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरूच असून शुक्रवारी काहीसा जोर कमी झाला होता. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ८ आणि महाबळेश्वरला अवघ्या १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर आवक कमी झाल्याने कोयना धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातील सुरू आहे. तर साताऱ्यात पावसाची उघडझाप सुरू होती.जिल्ह्यात मागील शनिवारपासून परतीचा पाऊस पडत आहे. मंगळवारी आणि बुधवारी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे ओढे, नाले खळाळले. तलाव भरुन वाहू लागले. जिल्ह्याच्या पश्चिम भागापेक्षा पूर्वेकडेच पावसाचा अधिक जोर होता. त्यामुळे माणगंगा, बाणगंगा नद्या भरुन वाहू लागल्या. त्यातच या पावसाने सोयाबीन, मका, कांदा, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक भागात उसही भुईसपाट झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत १४२० हेक्टरवरील पिकांचे नजरअंदाजे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असलातरी शुक्रवारी सहाव्या दिवशी जोर कमी होता. साताऱ्यात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. दुपारच्या सुमारास जोरदार सर पडली. तर जिल्ह्याच्या इतर भागातही जोरदार असा पाऊस झाला नाही. बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते.कोयनेला आतापर्यंत ४४६४ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ८ तर यावर्षी आतापर्यंत ४४६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच नवजा येथे १२ आणि जूनपासून आतापर्यंत ५१७५ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ५१८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.७३ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आलेला. पायथा वीजगृहातूनच २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.जिल्ह्यात सरासरी ५.७३ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ५.७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ पर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा - ७.४८, जावळी -५.०३, पाटण - ६.५५, कºहाड - ५.५४, कोरेगाव - ५.३३, खटाव - १.८१, माण - १.००, फलटण - २.११, खंडाळा - ५.३०, वाई - ८.२९ आणि महाबळेश्वर -२२.०८ मिलिमीटर.