‘जरंडेश्वर’च्या मालमत्तेवर टाच; ऊस गाळपाचे काय होणार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:21+5:302021-07-07T04:48:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंद अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा तिढा कोण सोडवणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तर कारखान्याची मालमत्ता जप्त झाल्यास काय? यामुळे कामगार व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी १८ वर्षांच्या संघर्षातून माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली. राज्य बँकेतून कारखाना उभारणीसाठी कर्ज घेतलेले होते. इतर बँकांचेही आर्थिक सहकार्य मिळाले. १९९९ ला कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांचे बंधू अॅड. वसंतराव फाळके व उपाध्यक्ष संभाजीराव बर्गे यांच्या कार्यकाळात २००० ते २००४ असे चार गळीत हंगाम शेतकऱ्यांनी पाहिले.
२००४ नंतर दुष्काळ व इतर अडचणींमुळे गळीत हंगाम पार पाडणे जिकिरीचे होत गेले. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यावर मात करण्यासाठी संस्थापिका डॉ. शालिनीताई पाटील यांनी केएम शुगर, वारणा समूह व स्नेहा शुगर यांच्याकडे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. शिखर बँकेच्या कर्जाचे चार वार्षिक हप्ते फेडल्यानंतर पाचवा भरण्यास विलंब झाला. ३ कोटींचा हप्ता थकला म्हणून राज्य बँकेने कारखान्याला जप्तीची नोटीस पाठवून लिलाव मांडला. गुरू कमोडिटीजने ६५ कोटी ७५ लाखांत कारखाना लिलावात घेतला. तर १२ कोटी भागभांडवल असलेल्या २७ हजार सभासदांचे स्वप्न भंग पावले.
शिखर बँकेच्या धनलक्ष्मी ठेव योजनेमध्ये कारखान्याची ८ कोटी ३४ लाख इतकी रक्कम होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज्य बँकेने कारवाई केल्याने डॉ. शालिनीताई पाटील यांनी शिखर बँकेविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, अनेक घडामोडी होऊन २२ ऑगस्ट २०१९ रोजी खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन एफआयआर दाखल केला.
आता कारखाना ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू झाली आहे. कारखान्याची मालमत्ता सध्या गुरू कमोडिटीजच्या नावावर आहे. ती जरंडेश्वर शुगर मिल, मेसर्स स्पार्कलिंग साइल प्रा. लि. यांना लीजवर देण्यात आली होती. आता ईडीच्या तपासातून अनपेक्षितपणे कोणती माहिती बाहेर पडणार, याकडे कोरेगाव तालुक्याबरोबरच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याकडे नोंद असलेल्या उसाच्या गाळपाचा तिढा कसा सुटणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
चौकट :
मागील वर्षी १४ लाख मेट्रिक टन गाळप
गतवर्षी जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी ९९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले. यामध्ये सर्वाधिक १४ लाख मेट्रिक टन गाळप एकट्या जरंडेश्वर शुगर मिल्सने केले होते. दैनंदिन २५०० मेट्रिक टन क्षमता असलेला हा कारखाना अल्पावधीत १० हजार मेट्रिक टन गाळप करू लागला. गेल्या चार ते पाच हंगामात समाधानकारक दर दिल्याने कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आता ईडीच्या कारवाईत जे होईल ते होईल; पण कारखाना बंद राहिला तर अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस कोठे जाणार, हा प्रश्न आहे.
.......................................................................