हेळगाव-खराडे रस्त्याचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:40 AM2021-04-09T04:40:49+5:302021-04-09T04:40:49+5:30
मसूर : बऱ्याच कालावधीनंतर पाडळी-हेळगाव-खराडे फाटा या रस्त्याचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले होते. मात्र फक्त २०० मीटर ...
मसूर : बऱ्याच कालावधीनंतर पाडळी-हेळगाव-खराडे फाटा या रस्त्याचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले होते. मात्र फक्त २०० मीटर अंतराचे खडीकरण झाल्यावर चार दिवसांतच हे काम पुन्हा ठप्प झाले आहे, तर गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. त्याचबरोबर हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
दोन ते अडीच वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम चालू झाले होते. पण, कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने पाडळीच्या ग्रामस्थांनी दोन वेळा चालू काम बंद पाडले होते. नंतर कोरोनाचा काळ चालू झाला व चालू असलेली कामे बंद करावी लागली, परंतु काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला खडी टाकायला सुरुवात झाली आणि पुन्हा राहिलेल्या कामास सुरुवात झाली होती. त्यानंतर फक्त २०० मीटर अंतरापर्यंतचे खडीकरणाचे काम पूर्ण करून गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम बंद करण्यात आले आहे.
कराड-कोरेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा, याशिवाय अनेक मोठी आणि बाजारपेठ असलेल्या गावांना जोडणारा हा मार्ग असल्याने या रस्त्याला दळणवळणाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. याखेरीज गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. दरवर्षी प्रशासन खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते, पण ते काही दिवसांनंतर उखडून पुन्हा आहे तीच परिस्थिती होत होती. या मार्गावरून ऊस वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे होणारा रस्ता मजबूत होणे गरजेचे आहे. या मार्गावरून साधारण प्रत्येक तासाला बसची एक फेरी चालू आहे. सदर रस्ता खराब झाल्याने अनेक छोटे-मोठे अपघात या मार्गावर घडू लागले होते. एव्हाना पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत होते अशा अनेक कारणांनी हा रस्ता चांगला होणे महत्त्वाचा असल्याने त्याचे काम त्वरित होणे गरजेच आहे.
चौकट
नागरिकांमध्ये संभ्रमावस्था
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेले या रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले होते. मात्र २०० मीटर चे खडीकरण पूर्ण केल्यावर हे काम कोणत्या कारणासाठी बंद आहे याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. नक्की काम कोणी बंद पाडले का आणखी काही अडचण आहे याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आढळून येत आहे.
वाहतुकीला अडचण...अपघाताला निमंत्रण....
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेले काम पुन्हा सुरू झाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा खडीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. मात्र पुन्हा काम बंद पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा पडलेले खडीचे ढिगारे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहेत.
बातमी व फोटो फोटो आहे हेळगाव ते खराडे फाटा रस्त्याचे काम पुन्हा ठप्प झालेले काम व रस्त्याकडेला टाकलेली खडी