महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2015 01:09 AM2015-07-05T01:09:51+5:302015-07-05T01:13:13+5:30

विजय शिवतारे : जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग प्राधिकरणाला सूचना

Highway work ends by December | महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत संपवा

महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत संपवा

Next

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामांत अत्यंत दिरंगाई सुरू असून कामाबाबत नागरिकांच्या आक्षेपार्ह तक्रारी आहेत. मी स्वत: पाच ते सहा दिवस प्रत्यक्षात या कामांचा अभ्यास केला असून मी पूर्णपणे असमाधानी आहे. नागरिकांच्या जीवाशी या मंडळींनी खेळ मांडला असून डिसेंबरपर्यंत महामार्गावरील सर्व अडचणी दूर करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
पुणे-बंगळूर महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक घटकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हा नियोजन भवनात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, एसटीचे अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या चर्चेची माहिती दिली.
पालकमंत्री म्हणाले, ‘पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा ते पुणे या अंतरात विविध समस्या कायम आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट पडलेली आहेत. मातीचे ढिगारे जागोजागी पडले आहेत. रिफ्लेक्टरचीही सुविधा नसल्याने अपघात होत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, त्यामुळे ही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या कामाचा संपूर्ण आढावा घेऊन डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना केल्या. महामार्गाच्या कामातील गुणवतेबाबत अधिकारीही समाधानी नाहीत. शासनाने जो ठेकेदार नेमला आहे, त्याने दोन वेगळे ठेकेदार नेमून काम सुरू ठेवले आहे. वास्तविक ज्याने ठेका घेतला आहे, त्यानेच गुणवत्ता राखणे गरजेचे असल्याने शासनाने ज्या ठेकेदाराला कामे दिली आहेत, त्याच ठेकेदाराने ती पूर्ण करावीत. अपघातग्रस्त लोकांना उपचाराची सुविधा संबंधितानेच द्यायला हवी. प्रत्येक टोलनाक्यावर २० टनाची क्रेन उपलब्ध करावी. ही संपूर्ण सुविधा मोफत देण्यात यावी. वैद्यकीय वाहनाची सोयही करावी. महामार्गाच्या कडेने रिफ्लेक्टरची सुविधा तत्काळ करावी,’ अशा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, २0१४ यावर्षात पुणे ते सातारा या महामार्गावर १२९ जणांना जीव गमवावा लागला आहे. रखडलेली कामे आणि सुविधेचा अभाव हीच कारणे त्याला जबाबदार आहेत. महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांनी आपल्या कामात तत्काळ सुधारणा करावी,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Highway work ends by December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.