आदर्की : फलटण पश्चिम भागातील हिंगणगाव जिल्हा परिषद गट, गणातील गावात कोरोनाचा कहर झाला असून, शेकडोजण बाधित रुग्ण निष्पन्न होत आहेत. रोज गावात कोरोनाचा बळी जात आहे. मतदार संघात खासगी किंवा शासकीय रुग्णालय नसल्याने सामाजिक, सहकार, संस्थांनी पुढे येऊन कोव्हिड सेंटर उभारण्याची मागणी होत आहे.
फलटण पश्चिम भागातील हिंगणगाव जिल्हा परिषद व गणात अनेक गावे कोरोनाचा हॉट स्पाॅट बनली आहेत. आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कापशी, आळजापूर, बिबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, हिंगणगाव प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या मतदार संघातील तरुण अनेक खासगी कंपनीत नोकरीस आहेत, त्यांची कोराेना चाचणी कंपनीमार्फत केली जाते. पण पुढे शासकीय कार्यालयात माहिती दिली जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग गावा-गावात वाढत आहे. उपचारासाठी जिल्हा व तालुका पातळीवर दाखल केले असले जात आहे. पण बरे होण्याऐवजी मृत्यूचे प्रमाण जादा असल्याने गावातून कुटुंबे रानात झोपड्या टाकून राहत आहेत.
फलटण पश्चिम भागात भयानक दुष्काळात अनेक संस्थांनी गावा-गावात जनावरांच्या छावण्या उघडून लाखो रुपयांचे पशुधन वाचवले.
फलटण पश्चिम भागात खासगी व शासकीय सुसज्ज रुग्णालय नसल्याने कोरोना रुग्णांना फलटण, लोणंद, सातारा येथे उपचारासाठी न्यावे लागत आहे, तरी
सामाजिक, सहकार, राजकीय व्यक्तींनी सामाजिक बांधलकीतून पुढे येऊन मंगल कार्यालय, शाळा, सांस्कृतिक हॉल, माध्यमिक विद्यालय अशा ठिकाणी कोविड सेंटर उघडून सर्वसामान्य रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे.