शिवथर येथे हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:02+5:302021-05-12T04:40:02+5:30
शिवथर : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत असून, आरफळ कृषी ...
शिवथर : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत असून, आरफळ कृषी मंडलातील शिवथर येथे हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत कृषी सहायक विनोद जांभळे, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे मंडल कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले. कृषी पर्यवेक्षक अभिजीत जाधव यांनी हुमणी किडीचा जीवनक्रम, त्याचे एकात्मिक पद्धतीने आणि जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रणाबाबत, तसेच लष्करी अळी नियंत्रणाबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या पद्धतीने कीड नियंत्रण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. हुमणीचे भुंगे नष्ट करण्यासाठी शेतातील बांधावर असलेल्या झाडाच्या खाली विजेचे प्रखर दिवे लावून प्रकाश सापळे तयार करावे, त्या खाली पाण्याने भरलेल्या टाकीत विजेच्या प्रखर प्रकाशामुळे भुंगे पडल्याने नष्ट होतात. त्याचप्रमाणे, हुमणीचे भुंगे पकडण्यासाठी एरंडीमिश्रित सापळा तयार करून तो शेतात ठेवण्याच्या पद्धतीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी शिवथर येथील अभिषेक साबळे, दत्तात्रय साबळे, संदीप साबळे, सोनू साबळे, संजय साबळे आदी शेतकरी उपस्थित होते.