अस्मानी पुरावर, माणुसकी ठरली वरचढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:34 AM2021-07-26T04:34:57+5:302021-07-26T04:34:57+5:30
वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडीवर अस्मानी संकट कोसळले; पण या अस्मानी संकटावर माणुसकीचा ...
वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडीवर अस्मानी संकट कोसळले; पण या अस्मानी संकटावर माणुसकीचा मदत रुपाने आलेला पूर वरचढ ठरला. दुर्घटनाग्रस्त देवरुखवाडीच्या मदतीला वाईकर, अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला.
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरसह वाई तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. वाईच्या पश्चिम भागात पावसामुळे हाहाकार माजला. अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्याने दळणवळणाला मोठी अडचणी येत होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोळेवाडी येथे भूस्खलन झाले, जोर येथे मायलेक पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्घटना घडली.
देवरुखवाडी-कोंढावळे (ता. वाई) येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अतिवृष्टीमुळे डोंगरावर भूस्खलन होऊन दगड, माती पाण्याच्या मिश्रणाचा मोठा प्रवाह २५ घरांची वस्ती असणाऱ्या देवरुखवाडीच्या दिशेने जोरदार वेगाने आला. दुर्दैवाने यात दोन मायलेकींचा मृत्यू झाला. सात घरे पूर्णपणे गाडली गेल्याने पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाली.
या नागरिकांचे दुःख हलके करण्यासाठी वाई तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या पंचवीस कुटुंबांना अन्न, धान्य, किराणा माल, ब्लँकेट, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य दिले. यामध्ये सर्योदय सेवा ट्रस्ट, रोटरी क्लब, आरपीआय युवा आघाडी, कृष्णा सेवा कार्य समिती, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वाई तालुका प्राथमिक शिक्षक, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, मानवता सेवा संघ यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली असून, मुंबईकर मित्र समूहाच्यावतीनेही मोठ्या प्रमाणावर मदत केली जाणार आहे. अस्मानी पुरावर, माणुसकीचा पूर वरचढ ठरला, असेच म्हणावे लागेल.
चौकट :-
जोर, गोळेवाडी अजूनही मदतीपासून वंचित...
मुसळधार पावसामुळे बोरगाव परिसरातील मुख्य रस्त्यावरील तीन पूल व जोर गोळेवाडी परिसरातील सहा पूल वाहून गेले आहेत. जोरला भूस्खलन होऊन तीन घरांचे नुकसान झाले व पुरात मायलेक वाहून गेले आहेत. गोळेवाडीलाही काही घरांचे नुकसान झाले; परंतु दळणवळण व्यवस्था कोलमडल्यामुळे अजून तेथील नागरिक मदतीपासून वंचित आहेत. दरम्यान, या दुर्गम भागात त्वरित मदत करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून नागरिक करत आहेत.
चौकट :-
सामाजिक संस्थांचे दातृत्व...
देवरुखवाडीवर आलेले संकट वाईच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत असूनही या अतिवृष्टीवर माणुसकी वरचढ ठरली. अनेकांच्या घरावर मातीचे ढिगारे तर इतर नागरिकांना कापड्यानिशी बाहेर पडल्याने अडचण झाली होती. यावेळी रोटरी क्लब, वाई यांनी ७० नागरिकांच्या जेवणाची सोय केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मानवता सेवा संस्थेच्यावतीने किराणा व धान्य देण्यात आले. त्याबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले.