ढेबेवाडी : अनेक वर्षांपासून लाकूडतोड्यांनी लक्ष केलेल्या ढेबेवाडी विभागातील वाल्मिक पठारावरील वनसंपदा धोक्यात आली असतानाच आता शिकाऱ्यांनाही येथील दुर्मिळ पशुपक्षांच्या हत्येचे वेध लागले आहेत. राज्यासह परराज्यातील शिकारी टोळ्यांचा वाल्मिक पठारावर वावर वाढल्याने येथे वनविभागाची दहशतच राहिली नसल्याने स्पष्ट झाले आहे. ब्रिटीश काळापासून वनविभागाचे नियंत्रण असलेल्या ढेबेवाडी विभागातील वनकार्यक्षेत्राचे दोन महिन्यांपासून प्रादेशिक वन्यजीव विभाग आणि परिमंडल वनक्षेत्र अशा दोन विभागामध्ये विभाजन झाले आहे. यापैकी मुळच्या वनक्षेत्राचे पुनर्वसन पाटण येथे करण्यात आले असून, नवीन प्रादेशिक वन्यजीव विभागाने आपले कार्यालय ढेबेवाडी येथे थाटले आहे. वनविभागाची दोन ‘शकले’ झाल्याने लाकूडतोड्यांसह शिकारी टोळ्यांनीही आपल्या हत्यारांना भलतीच धार लावली. वाल्मिक पठारासह या विभागातील सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्राची मालकी असलेल्या वनक्षेत्रात दुर्मिळ पशु-पक्षांची मोठी संख्या आहे. यामध्ये बिबटे, रानगवे, रानडुक्कर, काळविट, साळींदर, घोरपड, सर्पमार गरूड, मोर-लांडोर, अशा अनेक पशु-पक्षांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याएवढी कर्मचारी संख्या असल्याने संपूर्ण कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवतांना कर्मचाऱ्यांचीही दमछाक होते. अपुऱ्या कर्मचारी संख्येबराबरच येथील अधिकाऱ्यांचे कचखाऊ धोरणही वनसंपदा नष्ट होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शिकाऱ्यांवर वनविभागाने लक्ष ठेवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) पोलिसांच्या कारवाईने वनविभागाची नाचक्की ! वाल्मिक पठाराकडे शिकारींच्या उद्देशाने हत्यारबंद निघालेल्या सातजणांच्या टोळीला ढेबेवाडी पोलिसांनी आपल्या वाघरीत जेरबंद केले. निश्चितच या कामगिरीमुळे पोलिसांची मान उंचावली; पण वनविभागाचे काय ? त्यांनी आत्तापर्यंत अशी बहादुरी का दाखविली नाही ? असे अनेक प्रश्न वनविभागाच्या भूमीकेबाबत उपस्थित होत आहेत. दहा हजार क्षेत्रासाठी दहा कर्मचारी ! या विभागातील प्रादेशिक वन्यजीव विभाग आणि वनविभागाकडे २३ गावांसह शेकडो वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. यापैकी प्रादेशिक वनविभागाकडे ८ गावांसह ४८८३.८९ हेक्टर क्षेत्र तर वनविभागाकडे १५ गावांसह ४८९२.५३ हेक्टर क्षेत्राचा कारभार आहे. याच्या देखरेखीसह कार्यालयाचा भार वाहण्यासाठी केवळ दहाच कर्मचारी आहेत.
शिकारी टोळ्यांचा डोळा ‘वाल्मिकवर !
By admin | Published: October 13, 2015 10:03 PM