सातारा : सातारा पालिकेच्या विविध विषय समिती व सभापतिपदाच्या निवडी शनिवारी बिनविरोध पार पडल्या. यानंतर काही वेळातच खासदार उदयनराजे भोसले यांची सभागृहात एन्ट्री झाली. नूतन सभापती व सदस्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी सदस्यांशी काही वेळ चर्चा केली. सभागृहात बाहेर पडताना मात्र त्यांनी आपल्या खास शैलीत दोन्ही हातांनी कॉलर वर करीत व आय लव्ह यू आॅल म्हणत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात पीठासन अधिकारी तथा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नगराध्यक्षा माधवी कदम, मुुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम पार पडला. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सर्वच निवडी बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांनी जाहीर केले.सभापतिपदी साविआकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी उपगराध्यक्षपदी राजू भोसले यांना मात्र कायम ठेवण्यात आले आहे.
पाणीपुरवठा सभापतिपदी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापतिपदी यशोधन नारकर, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, बांधकाम सभापतिपदी मनोज शेंडे, महिला व बालकल्याण सभापतिपदी नगरसेविका अनिता घोरपडे तर महिला व बालकल्याण सभापतिपदी संगीता आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.स्थायी समितीच्या सदस्यपदी उपनरागराध्यक्ष राजू भोसले, नगरसेवक मनोज शेंडे, यशोधन नारकर, नगरसेविका स्नेहा नलावडे, अनिता घोरपडे, श्रीकांत आंबेकर, दत्ता बनकर, स्मिता घोडके व नगरविकास आघाडीच्या शेखर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.