ग्रामीण रुग्णालयात होणार ‘आयसीयु’ची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:04+5:302021-05-12T04:40:04+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या ...

ICU facility will be available in rural hospitals | ग्रामीण रुग्णालयात होणार ‘आयसीयु’ची सुविधा

ग्रामीण रुग्णालयात होणार ‘आयसीयु’ची सुविधा

Next

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर होण्याची स्थिती वाढली आहे. अशा परिस्थितीत लोकांना उपचार चांगले मिळावेत यासाठी खंडाळा ग्रामीण रुग्णालयात आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आमदार मकरंद पाटील यांनी रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण बाधित होत आहेत. खंडाळा तालुक्यातही मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत तसेच कोरोना कालावधीत जनतेला आधार मिळावा म्हणून सुसज्ज आयसीयु सेंटर गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह तीस बेडची व्यवस्था आहे. रुग्णांना उपचारासाठी तालुक्याबाहेर पाठवावे लागत आहे. त्यासाठी आयसीयु व्हेंटिलेटरची सोय तालुक्यातच होणे गरजेचे असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी पुढाकार घेऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाशेजारील जागेत आयसीयु सेंटर उभे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी स्थानिक आमदारांसह कंपनीचे योगदान मोलाचे ठरणार आहे.

या जागेची पाहणी आमदार मकरंद पाटील यांनी करून योग्य त्या सूचना केल्या. यावेळी सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, रमेश धायगुडे, तहसीलदार दशरथ काळे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. रवींद्र कोरडे उपस्थित होते.

फोटो

११खंडाळा आयसीयू

खंडाळा ग्रामीण रुग्णालयात आयसीयु सेंटर सुरू करण्यासाठी जागेची पाहणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. यावेळी तहसीलदार दशरथ काळे, सभापती राजेंद्र तांबे, मनोज पवार, रमेश धायगुडे उपस्थित होते. (छाया : दशरथ ननावरे)

Web Title: ICU facility will be available in rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.