माथेरानच्या धर्तीवर महाबळेश्वरला सवलत देण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:33+5:302021-07-09T04:25:33+5:30
सातारा : राज्य शासनाने जिल्हानिहाय निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले असल्याने तालुकानिहाय नवीन आदेश काढता येत नाहीत, तरीही माथेरानच्या ...
सातारा : राज्य शासनाने जिल्हानिहाय निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले असल्याने तालुकानिहाय नवीन आदेश काढता येत नाहीत, तरीही माथेरानच्या धर्तीवर महाबळेश्वरला सवलत देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीतून कोरोनाबाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चौथ्या स्तरातील निर्बंध लागू आहेत. या चाचणीतील बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात आणखी निर्बंध लागणार का? या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, पाच दिवसांचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत निर्णय घेतला जातो. जिल्ह्याचा काेरोना वाढीचा दर सरासरी ११.८६ टक्के इतका आहे. जिल्ह्यात कोरोना चाचण्याही मोठ्या प्रमाणात करत आहोत. कऱ्हाड तालुक्यात विशेष वाढ दिसत आहे. पाच दिवसांचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल.
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शालेय पोषण आहाराचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. याबाबत प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. पालकांच्याच खात्यात तुर्तास पैसे जमा करण्याबाबत निर्णय झालेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.