शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेच पालिका निवडणुकीत नेतृत्व करतील : शशिकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 03:56 PM2021-02-15T15:56:11+5:302021-02-15T15:58:04+5:30
Shivendrasinghraja Bhosale Satara- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील, असा बॉम्बगोळाच आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टाकला.
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील, असा बॉम्बगोळाच आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टाकला.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जनता दरबार आयोजित केला होता, यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, विजय कुंभार, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, 'पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडन्यावर सुरुवातीपासूनच भर दिलेला आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. दोन्हीमधील माझे राजकारण सुरूच राहणार आहे. माझ्या विचारांचे लोक जर एकत्र येऊन पक्षासाठी काम करत असतील तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? त्याचा कोणाला त्रास होत असेल तर मी काय करू शकणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर आम्ही भर दिला आहे; परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल.'
जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे दिवसेंदिवस जनता दरबाराला प्रतिसाद वाढत आहे आजच्या जनता दरबारामध्ये ८१ तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि तात्काळ या तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला, असेदेखील आमदार शिंदे म्हणाले.
सदाभाऊंचा ट्रॅक चुकलाय
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय अनेकांना महत्त्व प्राप्त होत नाही. सदाभाऊ अशा भूमिकेतूनच टीका करत आहेत. वास्तविक ते शेतकऱ्यांचे नेते आहेत. केंद्र शासन शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायला निघाले आहे. त्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनीच पाठिंबा द्यायला हवा होता. सदाभाऊ यांचा ट्रॅक चुकला आहे.
केंद्र शासन आंदोलनाला जुमानत नाही
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. दर पंधरा दिवसाला हे दर वाढत असून सामान्य नागरिकांची कुचंबणा होताना पाहायला मिळते. हे दर वाढत राहणार, अशी सवय लागून गेलेली आहे. केंद्र शासन आंदोलनांना जुमानत नाही, अशी परिस्थिती आहे.
जिल्हा बँकेला जावळीतून ठोकला शड्डू
शिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पक्षाची ताकद टिकून ठेवायची असेल तर मला काम करावेच लागेल. कोणाला वाईट वाटते म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार आहे.
- शशिकांत शिंदे, आमदार