महाबळेश्वरमध्ये शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन; CM एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

By दीपक शिंदे | Published: February 23, 2024 08:21 PM2024-02-23T20:21:48+5:302024-02-23T20:23:18+5:30

मंत्र्यांसह नाट्यकलावंतांची उपस्थिती

inauguration of 100th divisional natya sammelan in mahabaleshwar cm eknath shinde will attend | महाबळेश्वरमध्ये शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन; CM एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

महाबळेश्वरमध्ये शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन; CM एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी १२:३० वाजता उद्घाटन होणार आहे. या समारंभास परिषदेचे विश्वस्त, संमेलनाचे मुख्य निमंत्रक, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार मकरंद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर महोत्सव २०२४ चेही आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपस्थितीत होणार आहे. महाबळेश्वर महोत्सवांतर्गत येथील सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररीमध्ये ऐतिहासिक शास्त्र व वाहन (विंटेज कार) प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सेठ गंगाधर माखरिया गार्डन येथेही पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेठ गंगाधर माखारिया हायस्कूल प्रांगणामध्ये खाद्यपदार्थ व विविध वस्तू विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पालिकेच्या वतीने संमेलनासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नाट्यकर्मी, कलावंत, रंगीत तालमीच्या तयारीमध्ये गुंतले आहेत. या निमित्ताने संपूर्ण शहर सुशोभित करण्यात येणार असून, महाबळेश्वरकर संमेलनासाठी येणाऱ्या नाट्यकर्मींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

महाबळेश्वर येथील नाट्य चळवळीस गती मिळावी, या उद्देशाने हे संमेलन येथे आयोजित करण्यात आले असून, या संमेलनामुळे येथील नाट्यकर्मींना नवी ऊर्जा मिळणार आहे. पोलिस परेड मैदानावर संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास ‘छत्रपती शिवाजी महाराज नाट्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. शनिवारी, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातून दहा वाजता भव्य नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सिने व नाट्य कलाकारांची विशेष उपस्थितीत असणार आहे. या दिंडीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत. या दिंडीचे मुख्य वैशिष्ट विविध राज्यांचे वेशभूषा परिधान करून त्या राज्याचे नृत्य स्थानिक महिला सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे, महाबळेश्वर तालुका वारकरी संघटना या दिंडीमध्ये पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. या दिंडीची सुरुवात वेण्णा दर्शन येथून होणार असून, ही दिंडी बाजार पेठमार्गे पोलिस परेड मैदानावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य नागरी येथे या दिंडीचा समारोप होईल. दिंडी पोहोचल्यानंतर या नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: inauguration of 100th divisional natya sammelan in mahabaleshwar cm eknath shinde will attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.