सातारा : आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्रासह परदेशातील श्रोत्यांना भुरळ पाडणाऱ्या प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सहावे सुख’ या लेखन साहित्याचा समावेश पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे. त्यांच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या ‘साहित्यरंग’ पाठ्यपुस्तकामध्ये ‘सहावे सुख’ या ललित लेखाचा समावेश करण्यात आला आहे. चिनी माणसे परस्परांना भेटली की, ‘तुम्हाला सहा सुखे मिळो’ अशा शुभेच्छा देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती, प्रतिष्ठा, चांगला जोडीदार, आणि उत्तम संतती ही पाच सुखं असतात. हे सहावे सुख पाच सुखाहून फार वेगळे आणि दुर्मीळ असते. प्रयत्नांच्या पाऊलवाटेने जाताना आपल्या आयुष्यात अचानकपणे असा एखादा क्षण येतो किंवा असा एखादा प्रसंग घडतो, की आपण आतून बाहेरून मोहरून जातो. तो प्रसंग घडावा असं वाटत असताना अचानकपणे तो प्रसंग घडतो. आपल्या श्रमाचे, कष्टाचे, प्रयत्नांचे, प्रतिभेचे, उभ्या वाटचालीचे सार्थक करणारा तो क्षण म्हणजेच ‘सहावे सुख’, असा संदेश या लेखात देण्यात आला आहे.
पॉईंटर :
अभ्यासक्रमातील लेख
इयत्ता सहावी : कृतज्ञता पाठी
इयत्ता नववी : अभियंत्यांचे दैवत डॉ. विश्वेश्वरय्या
द्वितीय वर्ष : सहावे सुख
कोट :
पुस्तकांच्या वाचनातून होणारी मनन-चिंतन प्रक्रिया थंडावत चालली आहे. हातपाय न हलविता मेंदू ठप्प करणारी करमणूक घात आहे. तर ग्रंथांची साथसंगत मस्तकाला प्रेरक आहे. मस्तकातून जन्माला आलेल्या कल्पना, भावना आणि विचार आपले भविष्य ठरवत असतात. उज्ज्वल भविष्यासाठी ग्रंथ हे सुध्दा ‘सहावे सुख’ वाटू शकते. अभ्यासक्रमात या लेखाच्या समावेशाने निश्चितच आनंद झाला आहे.
- प्रा. डॉ. यशवंत पाटणे, सातारा
चौकट :
गौरवशाली लेख संपदा
महाराष्ट्रातील अग्रणी वक्ते म्हणून प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. त्यांनी ‘शेकोटी’, ‘स्वरगंगेच्या काठी’, ‘स्वयंशिल्पी’, ‘सुंदर जगण्यासाठी’, ‘चैतन्याचे चांदणे’ आदी ग्रंथांचे लेखन केले आहे. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, साहित्य जागृती पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नारायणपूर येथील डॉ.दीपक घाडगे यांनी डॉ. पाटणे यांच्या साहित्याचा अभ्यास या विषयावर पीएच.डी पदवी संपादन केली आहे.