कऱ्हाड : सैदापूर, कृष्णा कॅनॉल चौक परिसरात नागरिकांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत आहे. कृष्णा कॅनॉल परिसरात व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, या ठिकाणी ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहाची सोय करावी, अशी मागणी नागरिक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.
अंधाराचे साम्राज्य
मलकापूर : मलकापूर भाजी मंडई ते कृष्णा रुग्णालय परिसरात उपमार्गावर महिलांची नेहमीच वर्दळ असते. या परिसरात पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने अनेकवेळा अनुचित प्रकार घडतात. हा परिसर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतो. तसेच येथे उड्डाणपूल असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. अनुचित घटना रोखण्यासाठी येथे पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़
वन्यप्राण्यांचा उपद्रव
सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.
विद्यानगरमध्ये कचरा
कऱ्हाड : विद्यानगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ओला व सुका कचरा विखुरल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक व्यावसायिकही कचरा रस्त्यानजीकच टाकत आहेत. त्यामुळे परिसर बकाल बनत आहे. संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.