घरच्या घरीच प्रोनिंगद्वारे नेमका कसा वाढवता येतो रक्तातील ऑक्सिजन? जाणून घ्या सोप्या शब्दांत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:26+5:302021-05-08T04:40:26+5:30
सातारा : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अनेक रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ...
सातारा : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अनेक रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. जम्बो कोविड रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा गृहविलगीकरणातील सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ‘प्रोनिंग’ अर्थात, पालथे झोपून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे शक्य होत आहे.
कोविड काळात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी काही वेळ पालथे झोपण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. रुग्णालयात कृत्रिमरीत्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. कोविडची सौम्य लक्षणे किंवा ज्यांना कहीच लक्षणे नाहीत, अशा रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन नये, यासाठी डॉक्टर प्रोनिंग करण्याच्या सूचना देत आहेत. पालथे झोपल्याने फुप्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. परिणामी, कोविडचा प्रभाव कमी होण्याची शक्यता जास्त आहे. हा प्रयोग गृहविलगीकरणातील रुग्णांनी प्रामुख्याने करावा, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. ज्यांना कोणाला कोविडची कोणतीही लक्षणं नाहीत, त्यांनीही अशा प्रकारे झोपून त्यांच्या फुप्फुुसातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहण्यास मदत होते.
दोन तासांनी बदला कूस
पालथे झोपल्याने फुप्फुसांमध्ये रक्तपुरवठा जास्त होतो. त्यामुळे रक्त पुरवठ्यासोबतच रक्तातील ऑक्सिजनही फुप्फुसांमध्ये पोहोचते. परिणामी, फुप्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. अशा परिस्थितीत केवळ पालथे झोपून चालणार नाही, तर दोन तासांनी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपणे, तसेच काही वेळ पालथे झोपणे या पद्धतीने झोपल्यास फुप्फुसातील सर्वच भागांत चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यास मदत होते. परिणामी, ऑक्सिजन पातळी वाढते
फुप्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत
कोविडचा संसर्ग झाल्यानंतर सर्वप्रथम फुप्फुसांचे खालचे भाग संसर्गाने प्रभावित होतात. पालथे झोपल्याने या भागात रक्तपुरवठा जास्त होतो, तसेच डाव्या आणि उजव्या कडेवर झोपल्यास दोन्ही बाजूंनी म्हणजेच फुप्फुसांच्या सर्वच भागांना रक्ताचा पुरवठा होतो. पर्यायाने फुप्फुसांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा होतो, यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत मिळते.
- डॉ.प्रवीणकुमार जरग, जनरल फिजिशियन
गर्भवतींनी पालथे झोपणे टाळावे
गर्भधारण झालेली असेल, तर अशा महिलांनी पालथे झोपणे टाळावे, तसे शक्यही नाही. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण राखण्यासाठी गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- डॉ.अंजली मणेरीकर, स्त्रीरोग तज्ज्ञ
फुप्फुसांचे आरोग्य चांगले राहते
पालथे झोपल्याने फुप्फुसांमध्ये रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊ लागतो. परिणामी, रक्तसोबत ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोविड संसर्गामुळे प्रभावित झालेल्या भागातही ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, अशांनी पालथे झोपण्यासह दर दोन तासांनी उजव्या आणि डाव्या कडेवर झोपावे. त्यामुळे फुप्फुसांचे आरोग्यही चांगले राहते.
- डॉ.संजय साठे, छातीतज्ज्ञ
दृष्टिक्षेपात आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण बाधित : १,१८,४४५
रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : २१,५७१
एकूण मृत्यू : २,७४०