सातारा : जिल्ह्यात कोरोना संकट वाढत असून मंगळवारच्या अहवालानुसार आणखी २२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे सक्रिय बाधितांची संख्या आता ५७ वर पोहोचलीय. तर सध्या १० जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातच दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.जिल्ह्यात पूर्ण दोन वर्षे कोरोनाचे संकट राहिले. मार्च २०२० पासून सुरु झालेले हे संकट गेल्यावर्षी मे महिन्यापर्यंत कायम होते. या दोन वर्षांत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्यापेक्षा दुसरी लाट मोठी होती. त्यावेळी एकाच महिन्यात ६० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाने गाठले. त्यामुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयात सर्वत्र कोरोना बाधितच दिसून येत होते.या दोन्ही लाटेत अडीच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाने गाठले. तर सहा हजार लोकांचा बळी घेतला. हे संकट गेल्यावर्षी मे महिन्यानंतर निवळू लागले. त्यानंतर रुग्णसंख्या हळूूहळू कमी होत गेली. यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलेला. पण, गेल्या १५ दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागलीय.मागील पाच दिवसांचा विचार करता नवीन ६५ रुग्ण समोर आले आहेत. तर रविवारी एकाच दिवसात कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच मंगळवारच्या अहवालानुसार आणखी २२ रुग्णांची वाढ झाली. यामुळे भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीही मास्क वापराबाबत सूचना केली आहे. परिणामी कोरोना संकटाबाबत जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य विभागही उपाययोजना राबवत आहे.
२ लाख ८० हजार आतापर्यंत बाधित...जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून मंगळवारच्या अहवालानुसार गृह विलगीकरणातील ७ रुग्णांना मुक्त करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १० जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर आतापर्यंतच्या तीन वर्षांत जिल्ह्यातील बाधितांची संख्या २ लाख ८० हजार ८५९ नोंद झाली. त्यामधील ६ हजार ७३० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.