गोडोली : डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटकांच्या वाहनांचीही कडक तपासणी केली जाणार असून, आग न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कास पठार हे सुमारे एक हजार आठशे हेक्टरवर विस्तारलेले आहे. विविध वनसंपदेने आणि फुलांनी नटलेले हे पठार आहे. या निसर्गसंपदेची दखल घेत २०१२ मध्ये वर्ल्ड हेरिटेजने कास पठाराचा जागतिक यादीत समावेश केला होता. तेव्हापासून जगभरातील पर्यटकांची पावलेकास पठारवर वळू लागली होती.
कास पठारावरील वनसंपदेची भुरळ पर्यटकांसह अभ्यासकांना पडली आहे. मात्र गत दोन वर्षांत कासवर फुलांचा हंगाम हवा तसा बहरला नव्हता. तरीही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. हे संयुक्त वनसमितीला मिळालेल्या पंच्यान्नव लाखांच्या करावरून दिसून येते. मात्र कास पठारावर सतत लागत असलेल्या आगीच्या घटना या वनविभागाची मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
पठारावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वनविभागाने जाळ पट्टा मारला आहे. ज्यामुळे चुकून आग लागली तरी त्या पट्ट्याच्या आत जात नाही आणि वनसंपदेचा आगीपासून बचाव होतो. असे असताना आगीच्या घटना घडल्याने वनविभागाने त्याचे कारण शोधले असता या आगी काही उत्साही लोकांनी जाळ पट्ट्याच्या आत जात सिगारेटची थोटके टाकल्याने अथवा खोडसाळपणा केल्यानेच आग लागल्याच्या निष्कर्षाला वनअधिकारी पोहचले आहेत.