कराडच्या सुशोभीकरणासाठी लोकशाही आघाडीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:39 AM2021-04-07T04:39:35+5:302021-04-07T04:39:35+5:30

कराड : येथील नगरपालिकेतील लोकशाही आघाडीने शहर सुशोभीकरणासाठी खारीचा वाटा उचलत पालिकेस मौल्यवान प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती शहरातील ...

Initiative of the Democratic Front for the beautification of Karad | कराडच्या सुशोभीकरणासाठी लोकशाही आघाडीचा पुढाकार

कराडच्या सुशोभीकरणासाठी लोकशाही आघाडीचा पुढाकार

Next

कराड :

येथील नगरपालिकेतील लोकशाही आघाडीने शहर सुशोभीकरणासाठी खारीचा वाटा उचलत पालिकेस मौल्यवान प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती शहरातील एका चौकात ठेवण्यात येणार असून या माध्यमातून त्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहराचे रुपडे पालटले असून, यात लोकसहभाग म्हणून लोकशाही आघाडीने योगदान दिले आहे. या उपक्रमाचे अनुकरण झाल्यास शहर आणखी सुशोभित होण्यास वेळ लागणार नाही.

कोरोनाच्या संसर्गाला एक वर्ष उलटले आहे. या काळात माझे शहर ही माझी जबाबदारी मानत लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी मदतकार्यात योगदान दिले आहे. ऑक्सिजन चळवळीपासून सर्व प्रकारच्या मदतकार्यात लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्यासह नगरसेवकांचा सहभाग होता. स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान राबवण्यात सध्या पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यावर्षीही शहरात सुशोभीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्वच्छतेत लोकसहभाग वाढवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यात सहभाग देऊन लोकशाही आघाडीने अनुकरणीय पाऊल उचलले आहे.

येथील मूर्तिकार सोमनाथ भोसले यांनी फायबरमध्ये तयार केलेली ७ फूट उंचीची प्रतिकृती लोकशाही आघाडीने खरेदी करून ती पालिकेस भेट दिली आहे. आघाडीचे मार्गदर्शक, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना ही प्रतिकृती सुपुर्द करण्यात आली. स्वच्छंदपणे दोरीवर उड्या मारणाऱ्या मुलीची ही प्रतिकृती असून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, हाही यामागचा उद्देश आहे.

प्रतिकृती प्रदान करताना शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, शिवाजी पवार, सुहास पवार, जयंत बेडेकर, अनिल धोत्रे, पोपटराव साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवंगत पी. डी. पाटील यांनी शहराचे नगराध्यक्षपदी असताना कराडचा सर्वांगीण विकास केला. या शहराच्या सुविधांमध्ये, सौंदर्यीकरणात यापुढेही भर पडावी, अशी लोकशाहीची भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्यासाठीच ही अप्रतिम कलाकृती पालिकेस भेट देण्यात आली आहे, असे सौरभ पाटील यांनी सांगितले. विठामाता विद्यालयाच्या चौकात किंवा लाहोटी कन्या प्रशालेच्या चौकात ती पालिकेच्या माध्यमातून बसवण्यात येणार आहे.

फोटो :प्रतिकृती

Web Title: Initiative of the Democratic Front for the beautification of Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.