सातारा : लॉकडाऊननंतर खासगी शिवशाही गाड्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या आहेत. त्यातील एक गाडी पेटवल्याने अन्य पाच गाड्याही जळून खाक झाल्या. यामध्ये काही कोटी रुपयांचे नुकसान झाले तसेच प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी संबंधित कंपन्यांना त्यांच्या गाड्या अन्यत्र सुरक्षित ठिकाणी लावण्यास सांगितले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी त्यांच्या ताफ्यात शिवशाही गाड्या दाखल केल्या. यामध्ये काही गाड्या एस. टी. महामंडळाच्या आहेत तर काही गाड्या विविध खासगी कंपन्यांच्या आहेत. मात्र, त्या एस. टी.च्या प्रवाशांना सेवा देत आहेत. या कंपन्यांशी करार करताना खासगी कंपन्यांनी एस. टी.च्या नियोजित वेळेपूर्वी अर्धा तास बसस्थानकात गाडी आणणे आवश्यक आहे. तसेच काही तांत्रिक काम असल्यास तेवढ्यापुरती गाडी बसस्थानक आवारात लावता येते.
कोरोनाचा शिरकाव मार्चमध्ये झाला, तेव्हापासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्याचकाळात खासगी ३२ शिवशाही गाड्याही लावण्यात आल्या होत्या. त्या गेल्या अकरा महिन्यांपासून एकाच ठिकाणी बंद असल्याने लॉक झालेल्या आहेत. त्यांचे दरवाजेही उघडे असल्याने कोणीही आत जाऊन बसत आहेत. अशातच बुधवारी झालेल्या दुर्घटनेमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. सातारा बसस्थानकात दररोज सरासरी दहा ते बारा हजार प्रवाशांची वर्दळ असते. भविष्यात अशा घटना घडल्यास प्रवाशांना इजा पोहोचू नये यासाठी एस. टी. महामंडळाने संबंधित कंपन्यांना त्यांच्या गाड्या सुरक्षित ठिकाणी लावण्याची सूचना केली आहे.
चौकट :
शहर बसस्थानक अन् बाकडे
खासगी शिवशाही गाड्या सेव्हन स्टार इमारतीजवळ लावलेल्या आहेत. त्यामुळे मोठी जागा अडकून पडली आहे. प्रवाशांना थांबण्यासाठीच जागा अपुरी पडत असल्याने ते गाड्यांना चिटकून उभे असतात. त्यामुळे गाड्या बाहेर काढण्यासाठीही जागा नसते. खासगी शिवशाही गाड्या काढण्यास सांगून तेथे शहर वाहतुकीचा बसथांबा, प्रवाशांसाठी बाकडे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मैदानात वावरणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी होईल.