शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त कांचन साळुखे यांच्या वतीने सोसायटी सभासदांना विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:29+5:302021-04-08T04:40:29+5:30
सातारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी व जनतेच्या हितासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे सर्वांना आवाहन केले ...
सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी व जनतेच्या हितासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे सर्वांना आवाहन केले होते. कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर ओढवलेले असताना अनेक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, नोकरी-धंद्यात अडथळे आले, आर्थिक व्यवस्था पूर्ण ढासळली, सामान्य लोकांना जगण्याही कठीण झाले आहे. एकंदरीत आर्थिक मंदीचे सावट सगळीकडे पसरले आहे. याचा विचार करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पाटेश्वर विकास सेवा सोसायटी देगाव या सोसायटीच्या सर्व सभासदांना संस्थेच्या अध्यक्षा कांचन साळुंखे यांनी प्रत्येकी १ लाख ३० हजार रकमेच्या विम्याचे संरक्षण स्वखर्चाने करून दिले आहे. याकरिता सातारा एसके फेमिना फार्मिंटन फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत जनता अपघात विमा पाॅलिसी रक्कम १.०० लाख रुपये आणि युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम पॉलिसी प्रत्येकी ३० हजार रुपयांचे एकत्रित विमा पॉलिसीचा संपूर्ण विमा हप्ता रक्कम २ लाख १० हजारांचा धनादेश शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी
यांना देण्यात आला.
दिवंगत अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी लावलेल्या सहकारातील या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पाटेश्वर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन कांचन साळुंखे व सर्व संचालक मंडळ यांनी सभासदांच्या हिताची धोरणे वेळोवेळी राबविल्याने जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ सभासदांना दिलेला आहे. सभासदांना विम्याचे संरक्षण स्वखर्चातून देऊन त्यांनी सहकारात एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीच्या प्रसंगी मदत मिळणार आहे. पाटेश्वर सोसायटीचे सर्व सभासद व त्यांच्या परिवारात यामुळे आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण
झाले असून सहकाराचा खरा अर्थ आपल्या प्रत्यक्ष कृतीतून कांचन साळुंखे यांनी व्यक्त केला. अभयसिंहराजे भोसले यांच्या विचारांच्या शिदोरीवर त्या सामाजिक बांधिलकीने कार्य करीत आहेत. माझ्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून संस्थेने सहकार समृद्धीचे उत्तम कार्य केले असल्याने मी कांचनताई साळुंखे व सर्व संचालक मंडळ व सभासद यांना धन्यवाद देतो, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. (वा. प्र.)