दुष्काळाच्या चटक्यानंतर धुक्यात घुसमट

By admin | Published: October 4, 2015 09:18 PM2015-10-04T21:18:34+5:302015-10-05T00:15:46+5:30

संकट टळता टळेना : करपासह विविध रोगांचा पिकांवर प्रादुर्भाव; निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला

Intrusive after drought | दुष्काळाच्या चटक्यानंतर धुक्यात घुसमट

दुष्काळाच्या चटक्यानंतर धुक्यात घुसमट

Next

भुर्इंज : पावसाळ्याआधीच पडलेल्या अवकाळी पावसाने हळदसह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पडलेल्या दुष्काळामुळे बागायती भागातही शेतकरी अडचणीत आले. आणि आता धुके पडू लागल्याने भुर्इंज परिसरातील पिकांवर करपासह विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला दुष्टचक्राचा फेरा संपता संपेना, अशी परिस्थिती आहे.अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तरीदेखील कंबर कसून उभे राहिलेल्या शेतकऱ्यांना पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे पिके धोक्यात आली. त्यातच आता गेली काही दिवस धुके पडू लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडणचीत आले आहेत. धुक्यामुळे पिकांवर रोग पडू लागले असून, हळदसह विविध पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला आहे.याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी उत्तमराव भोसले म्हणाले, ‘आम्हाला निसर्गाचे काहीच कळेनासे झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान केले, दुष्काळाने फटका दिला आता धुकं आम्हा शेतकऱ्यांची वाट लावत आहे. हळद पिकावर करपा पडला आहे. इतर पिकांनाही या धुक्याचा मोठा फटका बसत असून, आम्ही बागायती भागातले म्हणून आमच्या नुकसानीची दखल सरकारही घेईना. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची मात्र वाट लागत आहे. (वार्ताहर)

धुकं पिकांना घातकच--धुकं पडलं की शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण होते. कारण धुक्यामुळे पिकांवर करपा आणि तांबरा यासह विविध रोग आक्रमण करतात. पोटच्या पोरावानी सांभाळलेली पिकं या रोगांनी वाया जाण्याची भीती अधिक असते. हळद, ज्वारी, गहू, आलं, सोयाबीन अशी नगदी पिकं यावेळी शेतात बहरलेली असतात; पण याच पिकांना धुक्यामुळे या रोगांचा जास्त धोका असतो. सध्या या रोगांचा प्रादुर्भाव या परिसरात दिसत असून, निसर्गाने का अवकृपा केली हेच समजेना? असा प्रश्न भुर्इंज येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब जाधवराव व जांब येथील दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित केला.

Web Title: Intrusive after drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.