किडगाव : सातारा ते वाई मार्गावर असणाऱ्या वर्ये (ता. सातारा) येथील वेण्णा नदीच्या पुलाचे कठडे तुटले असल्याने हा पूल सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे.
गेली काही दिवसांपासून या पुलाच्या कठड्याची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या कठड्यावर रात्री मोठे वाहन धडकल्याने हा लोखंडी कठडा तुटल्याने नदीच्या पात्राच्या दिशेला लोंबकळले अवस्थेत आहे.
सातारा ते वाई मार्गावर हा महत्त्वाचा पूल समजला जातो. मुंबई, पुणे, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, नेले किडगाव, धावडशी, रामनगर परिसरात या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. साताऱ्याच्या दिशेने या पुलावरून येत असताना धोकादायक वळणही आहे. त्यामुळे नवख्या वाहनचालकाला हा पूल दिसतच नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्याचबरोबर पुलाच्या कोपऱ्यात येथील स्थानिक रहिवासी तसेच येणारे जाणारे मोठ्या प्रमाणात येथे कचरा टाकत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.
हा पूल ब्रिटिशकालीन पूल म्हणून ओळखला जातो. याचे नूतनीकरण होऊन जवळपास आठ ते दहा वर्षे झाली. त्या वेळेला या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण लोखंडी कठडे उभे केले गेले. मात्र, त्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे लोखंडी कठडे अत्यंत कमकुवत झाल्यामुळे ते तुटू लागलेले आहेत. लोखंडी कठड्याला गंज पकडलेला आहे. त्याला असणारा रंगही गायब झालेला आहे.
चौकट..
दुरुस्ती करण्याची मागणी...
सध्या ज्या ठिकाणी हा लोखंडी कठडा तुटला आहे तो वाहनधारकांना वळणाचा रस्ता असल्याने दिसत नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री या पुलावर मोठा अपघात घडू शकतो. आत्तापर्यंत या ठिकाणावरून अनेक छोटी-मोठी वाहने सरळ नदीपात्रात गेली आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या संरक्षण कपड्यांमुळे या पुलाला थोडासा आधार आलेला आहे. रस्ते विभागाने या तुटलेल्या लोखंडी कठड्याची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.
२७किडगाव
वर्ये (ता. सातारा) येथील वेण्णा नदीच्या पुलाचे कठडे तुटले असल्याने हा पूल सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे. वर्ये (ता. सातारा) येथील वेण्णा नदीच्या पुलाचे कठडे तुटले असल्याने हा पूल सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे.