शेनवडीत युवकांच्या पाठबळाने आयसोलेशन कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:54+5:302021-05-04T04:17:54+5:30
पुसेसावळी : शेनवडी ता. खटाव गावामध्ये वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावातील युवकांनी गावामधील हायस्कूलमध्ये आयसोलेशन कक्षाची निर्मिती ...
पुसेसावळी : शेनवडी ता. खटाव गावामध्ये वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावातील युवकांनी गावामधील हायस्कूलमध्ये आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली आहे.
यात ‘चिमूटभर प्रशासनाने मूठभर जनता’ या सूत्राप्रमाणे जनतेनेच प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य केले, तरच आपण या लढाईत जिंकू शकू. यासाठी शेनवडी गावच्या युवकांनी व प्रतिष्ठित व्यक्तींनी मिळून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबविला आहे. यामध्ये रुग्णांची होणारी फरफट कमी होईल व प्रशासनाचा थोडा का होईना, पण शेनवडी गावापुरता तरी ताण कमी होईल, हे लक्षात घेऊन आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सद्यपरिस्थितीचा विचार केला, तर आरोग्य विभागावर प्रचंड असा ताण आलेला आहे. रुग्णांना मूलभूत सेवा देणे आता आरोग्य विभागाला शक्य होत नाही. कारण रुग्णांची संख्याच खूप वाढली आहे. यासाठी शेनवडी गावच्या युवकांनी लोकवर्गणीतून आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षात २२ बेडची सोय करण्यात आली आहे. यामध्ये दोन ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या सुविधाही करण्यात आल्या आहेत. येथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टर, आरोग्य सेवक व आशा सेविका डोळ्यात तेल घालून काम करत आहेत.
या आयसोलेशन उपक्रमाचे उद्घाटन चोराडे उपकेंद्राचे डॉ. कुंभार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाचे व गावातील युवकांचे भरभरून कौतुक केले. हा उपक्रम करताना गावातील सरपंच ज्ञानेश्वर कोकाटे, उपसरपंच बबन माळी, आनंदा घाडगे, रवींद्र घोडके, किरण कोकाटे, सुभाष कोकाटे, अतुल दबडे, सतीश कोकाटे, राजू घाडगे, जहाँगीर तांबोळी, सागर जाधव, संजय सुतार, विश्वास चव्हाण, मारुती घोडके, ज्ञानेश्वर जाधव, सचिन सातपुते, सदाशिव कोकाटे, अधिक वाघमारे, आबासाहेब रसाळ, पोलीसपाटील सागर भुजबळ यांचे सहकार्य लाभले आहे.