लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांकडून वसूल करत असलेल्या शैक्षणिक फी व इतर तक्रारींबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तक्रार प्राप्त शाळांची बैठक गुरुवार, ८ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.
कोरोनाकाळात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सेवा तेवढीच फी घेण्याची भूमिका सातारा जिल्हा पालक संघाने वारंवार शाळा व्यवस्थापनाकडे मांडली. मात्र, शासकीय हस्तक्षेपाशिवाय सुरू असलेल्या या बैठकीत ठरलेल्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात टोकाचे मतभेद होऊ लागले आहेत. शासनाचे अनुदान न घेता शाळा चालवणे कठीण असल्याचे शाळा व्यवस्थापन सांगते तर पालकांचे उत्पन्न कमी झाल्याने यंदा ना नफा ना तोटा तत्त्वावर शाळांनी फी आकारणी करावी, अशी पालक संघाची भूमिका आहे.
गेल्या काही महिन्यांत सुरू असलेल्या शाळा व्यवस्थापन आणि पालक संघ यांच्या संघर्षावर जिल्हाधिकारी यांनी सुवर्णमध्य साधून पालक आणि शाळा यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. बैठकीत ठरलेल्या प्रत्येक गोष्टी या बैठकीला उपस्थित असलेल्यांनी नंतरही मान्य करणं बंधनकारक करावे, अशी अपेक्षाही संघाने व्यक्त केली आहे.
चौकट :
डोनेशनच्या रकमेचे गौडबंगालही उलगडावे
प्रत्येक वर्षाला नवीन प्रवेशासाठी शाळेत विनाडोनेशन प्रवेश मिळतच नाही. पालकांना निव्वळ एका कागदावर अमुक रक्कम मिळाली इतकेच लिहून दिले जाते. काही शाळा तर तीही तसदी घेत नाहीत. सरासरी दहा वर्षांची जुनी शाळा असली तरीही प्रत्येक वर्षी दोनशे विद्यार्थी आणि प्रत्येकाकडून सरासरी १५ हजार रुपयांचे डोनेशन घेतले तरीही याची मोठी रक्कम शाळांकडे वर्षानुवर्षे जमा होत जाते. अनेक शाळा तर ही रक्कम लेखा परीक्षणातूनही वगळते, असा आक्षेपही सातारा पालक संघाने नोंदविला आहे. शाळा प्रशासनाने सुद्धा सामाजिक बांधिलकीच्या ढालीमागे न लपता आम्ही शाळा हा व्यवसाय म्हणून करतोय, असे जाहीर करावे, असे आवाहनही संघाने केले आहे.
चौकट :
या शाळांबाबत आहेत तक्रारी
सातारा जिल्हा पालक संघाकडे युनिर्व्हल नॉलेज स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोपर्डे हवेली व तामजाईनगर, पाईनवूड हायस्कूल पाचगणी, मेरीमाता इंग्लिश संकुल दहिवडी, होली फॅमिली स्कूल सैदापूर, छाबडा मिलिटरी स्कूल रायगाव, मोना स्कूल सातारा, रयत इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्विट मेमरी स्कूल पाचगणी या शाळांच्या बाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.