समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्ती लावतेय लळा, तिथेच धोका ओळख बाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 03:43 PM2024-12-11T15:43:39+5:302024-12-11T15:45:45+5:30

हाय आणि छान दिसतेस यापासून सुरू हाेणाऱ्या संवादातून पुढे भलताच गुंता

It is important to understand the danger if any stranger is trying to get close through social media | समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्ती लावतेय लळा, तिथेच धोका ओळख बाळा !

समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्ती लावतेय लळा, तिथेच धोका ओळख बाळा !

सातारा : कुटुंबातील बंधने, पालकांचा ओरडा आणि चांगल्या वागण्याचा ताण असह्य झालेली तरुणाई आता अनेकांच्या टार्गेटवर येऊ लागली आहे. सोशल मीडियाच्या विविध ॲप्सच्या माध्यमातून मेसेंजरमध्ये डोकावणे आता सहज शक्य होऊ लागले आहे. महिलांच्या हाय आणि छान दिसतेस यापासून सुरू हाेणारा संवाद पुढे भावनिक पातळीवर जातो. यातून गाठीभेटी, जवळीकता, खर्च केल्यामुळे आलेली उपकाराची भावना असा भलताच गुंता होऊन बसतो. हे नाते राखणं आणि सोडणं तरुणींना जमत नसल्याने त्या अलगद सेक्स रॅकेटमध्ये अडकत चालल्या आहेत. त्यामुळे अनोळखी कोणीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथेच धोका असे समजणे गरजेचे आहे.

सातारा पोलिसांच्या वतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने रील स्टार असलेल्या ३२ वर्षीय तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने वेश्या व्यवसाय सुरू केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. एका ध्वनीफितीच्या आधारावर उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे सोशल मीडियाचे विश्व आणि त्यात रूतत जाणारी तरुणाई हे भीषण वास्तव्य समोर आले आहे. समाज माध्यमांवर अनोळखी मैत्री, त्यातून गाठीभेटी, मुलींसाठी खर्च करून त्यांना ऋणात ठेवून त्यांना वेश्या व्यवसायाच्या सापळ्यात अडकविण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा समाज माध्यमांवरील मैत्री चर्चेत आली.

समाजमाध्यमांवर अनोळखी मैत्री टाळा

मोबाइलमुळे अवघे जग एका क्लिकवर आले आणि कुटुंबीय परस्परांशी दुरावले. परिणामी बाहेरचे जग आपलेसे करण्यासाठी तरुणाई सोशल मीडियावर अड्डा जमवू लागली. अनोळख्या व्यक्तींच्या भावनिक मेसेजला प्रतिसाद देऊ नये. कारण बहुतांश वेळेला अनोळखी व्यक्ती विशिष्ट उद्देश ठेवून बुद्धीने मेसेज करत असतो तर तरुणाई मनाने उत्तर देत असते. मन आणि मेंदूचे हे द्वंद्व मुलींना आयुष्यभरासाठी धडा शिकवून जाते.

संगत तपासून पाहा

महाविद्यालय आणि क्लास या दोन्हीशिवाय अन्यत्र कुठेही जायचं असेल तर कुटुंबात मित्र-मैत्रीण सोबत आहेत हे सांगितले जाते. घरातून बाहेर पडताना दाेन आणि बाहेर गेल्यावर चार अशी परिस्थिती प्रत्यक्ष असण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘संशयी पालक’ म्हणून शिक्का बसला तरी चालेल पण मुलांची संगत तपासणे महत्त्वाचे ठरते.

या कारणांनी अडकतात जाळ्यात

तरुण वयात कुटुंबातून ज्या गोष्टींना विरोध केला जातो ते सगळं मुला-मुलींना हवंहवंसं वाटते. हाॅटेलिंग, लाँग ड्राइव्ह, आऊटींग, सरप्राइज पार्टी, मोबाइल रिचार्ज, महागडे गिफ्ट अशी ही मोठी यादी आहे. याच आधारावर मुलींना जाळ्यात ओढले जाते. त्यामुळे रोजरोज पार्टी देणारी मैत्रीण असली तरीही तिच्या पालकांशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरते.

यशाचं सादरीकरण म्हणून ऐपत नसतानाही पालक मुला-मुलींना महागडे मोबाइल भेट देतात. जगाशी स्पर्धा करण्यासाठी या गॅझेटची मुलांना जशी गरज आहे, त्याच पद्धतीने पालकांनीही याचा स्मार्ट वापर शिकून घ्यावा. ‘आम्हाला यातले काही समजत नाही असे म्हणण्यापेक्षा मुलांना याचे ज्ञान पालकांनी देण्याची गरज निर्माण झाली आहे.- वैदेही बगाडे, पालक
 

सोशल मीडियाच्या अति वापरामुळे महाविद्यालयीन मुला-मुलींची मोठी फसगत होत आहे. अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळण्यापासून स्वत:चे खासगी फोटो कोणालाही शेअर न करण्याचे बंधन तरुणाईने पाळणे गरजेचे आहे. व्हिडीओ काॅल आणि डेटिंग ॲप सध्या नवी डोकेदुखी ठरू पहात आहे. - जय गायकवाड, सायबर तज्ज्ञ

Web Title: It is important to understand the danger if any stranger is trying to get close through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.