गव्याला पाव खाऊ घालणे पडले चांगलेच महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:13 AM2021-03-13T02:13:48+5:302021-03-13T02:14:27+5:30
वनविभागाने बजावली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर (जि. सातारा) : क्षेत्र महाबळेश्वर येथे रस्त्यालगत असणाऱ्या हाॅटेलमालकाला गव्याला पाव खाऊ घालणे चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाने इब्राहिम महंमद पटेल (रा. जणवाडी, महाबळेश्वर) यांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदविला आहे.
त्यामध्ये क्षेत्र महाबळेश्वरमध्ये एक नागरिक गव्याला पाव खाऊ घालून त्याच्याशी बोलत असल्याचा व्हिडिओ महाबळेश्वरमधील सोशल मीडिया ग्रुपवर शनिवारी व्हायरल झाला. याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे.
इब्राहिम पटेल यांचे क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याजवळ शेती व हॉटेल आहे. यांच्या शेतात गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळच्या वेळेला गवे चरायला येत होते. प्राणिमात्रांवरील दयेतून पटेल हे गव्यांना खाण्यासाठी पाव टाकू लागले. हा त्यांचा रोजचा उपक्रम झाला. दोघांचीही भीती मोडल्याने इब्राहिम पटेल गव्यांना हाताने पाव भरवू लागले. वन्यजिवांना खाद्यपदार्थ भरविणे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी सांगितले.
मानवनिर्मित खाद्य भरविणे निसर्गविरोधी कृती
वन्यजिवांना मानवनिर्मित खाद्य भरविणे ही निसर्गविरोधी कृती आहे. त्यामुळे वन्यजिवांना सवय लागते. ज्या वेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा ते माणसांवर हल्ले करतात. यातून माणसाच्या किंवा वन्यजिवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची काळजी घेतच असतो. मोर, माकड, कबुतरे यांना बाह्य खाद्य घालू नये. वन्यजिवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही वनप्रेमींनी दिला आहे.