महाबळेश्वर : क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यालगत असणाऱ्या हाॅटेल सबा गार्डनच्या मालकाला गव्याला पाव खाऊ घालणे चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. याबाबत महाबळेश्वर वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरमधील सोशल मीडिया ग्रुपवर शनिवार, दि. ६ रोजी क्षेत्र महाबळेश्वरमध्ये गव्याला एक नागरिक पाव खायला घालत आहे व बोलत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली होती. याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे.
वन्यजीव अभ्यासकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत तो तातडीने थांबवावा, असे मत व्यक्त केले आहे होते. इब्राहिम महंमद पटेल (रा. जणवाडी, महाबळेश्वर) यांच्या नावे क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याजवळ शेती व हॉटेल आहे. यांच्या शेतात गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळच्या वेळेला गवे चरायला येत होते. प्राणिमात्रांवरील दयेतून इब्राहिम पटेल हे गव्यांना खाण्यासाठी पाव टाकू लागले. हा त्यांचा रोजचा उपक्रम झाला. दोघांचीही भीती मोडल्याने इब्राहिम पटेल गव्यांना हाताने पाव भरवू लागले. याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. वनविभागाने या ध्वनिचित्रफितीची दखल घेत इब्राहिम
पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदवला आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवणे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी सांगितले.
चौकट
मानवनिर्मित खाद्य भरवणे निसर्गविरोधी कृती
वन्यजीवांना मानवनिर्मित खाद्य भरवणे ही निसर्गविरोधी कृती आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवल्याने त्यांना त्याची सवय लागते. ज्या वेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा माणसांवर हल्ले करून ते हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. यातून माणसाच्या किंवा वन्यजीवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची योग्य काळजी घेतच असतो. त्यामुळे वन्यजीवांना मानवी खाद्य भरवण्याची गरज नसते. मोर, माकड, कबुतरे अशा प्राण्यांना बाह्य खाद्य घालू नये. वन्यजीवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही वनप्रेमींनी दिला आहे.