ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 02:21 PM2021-01-27T14:21:48+5:302021-01-27T14:24:23+5:30
road safety Trafic Satara- सातारा येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.
सातारा : येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.
सातारा शहरातील पोवईनाका परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटर या महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. अनेक वर्ष या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते; परंतु उद्घाटनाविना हा प्रकल्प सुरू होत नसल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेतील पदाधिकारी यांना सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. मात्र हे उद्घाटन अधिकृत नसल्याने व शासनाचा कोणताही प्रोटॉकल न पाळता ते झाले असल्याने पुन्हा एकदा रीतसर उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली.
शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुलगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रेड सेपरेटर हे साताऱ्यात झालेले उल्लेखनीय काम आहे. पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येत असल्याने वाहनांची कोंडी होत होती, त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रेड सेपरेटर चे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू होते.
पालिकेकडे होणार हस्तांतरण
ग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पूर्ण करण्यात आलेले आहे. आता याची देखभाल दुरुस्ती नगरपालिकेने पाहायची आहे. त्यामुळे हा ग्रेड सेपरेटर काही दिवसांत पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती असून त्याबाबत प्रशासकीय हालचाली देखील सुरू आहेत.
आधी सीसीटीव्ही बसवा
ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनानंतर लावलेला फलक पाठवून खाली पडला होता. या फलकामुळे सातारा शहरातील वातावरण तंग झाले होते, त्यानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाद देखील उमटले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा फलक फाडून जमिनीवर फेकल्याची अफवा पसरली होती; परंतु एका खासगी इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये हे वस्तुस्थिती समोर आली.
ग्रेड सेपरेटरचे काम करत असताना आतल्या बाजूला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. सध्या रात्रंदिवस या ग्रेड सेपरेटर मधून वाहतूक सुरू आहे. अनेक धूम स्टाईल बाईक चालक या ग्रेड सेपरेटर मधून गाड्या ठेवत आहेत तसेच काही चारचाकी वाहन चालक देखील अतिशय वेगाने वाहने नेताना दिसत असून अपघात झाला तर त्याची सुतराम कल्पना पोलीस विभागाला लागणे कठीण होईल यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव ग्रेड सेपरेटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.