सातारा :
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेणारे दोघे चुलत बहीण-भाऊ असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची चेन हस्तगत करण्यात आली आहे.
हुसेन मोहम्मद शफी काष्टेकर (वय २०, रा. घी गल्ली, बेळगाव, कर्नाटक), रुक्साना सलीम चिंनगुंडी (रा. महालिंगपूर, बेळगाव, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या चुलत बहीण-भावांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील राजसपुरा पेठेमध्ये बीबीहव्वा बशीरभाई बागवान (वय ६३) या एकट्याच राहतात. दि. २९ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरात घुसून एक महिला व पुरुषाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली होती. भर वस्तीत हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस निरीक्षक सुधीर कदम यांनी आपल्या टीममार्फत तातडीने याप्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यामार्फत माहिती काढल्यानंतर ही चोरी हुसेन काष्टेकर याने एका महिलेच्या साथीने केली असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी काष्टेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चाैकशी केली असता त्याने आपली चुलत बहीण रुक्साना हिच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातून रुक्सानाला अटक केली. तिच्याकडून चोरीची सोन्याची चेन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सहायक फाैजदार एस. आर. दिघे, पोलिस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, अभय साबळे, गणेश भोंग, संतोष कचरे यांनी केली.
एकटी वृद्धा पाहून मन फिरलं...
हुसेन काष्टेकर हा गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील नातेवाईकांकडे आला होता. त्यावेळी बीबीहव्वा बागवान या एकट्याच घरात राहत असल्याचे त्याला दिसले. त्यांच्या गळ्यातील चेन आणि घरात काही दागिने असतील तेही हाती लागतील, असे वाटल्याने त्याने चुलत बहीण रक्साना हिला कर्नाटकातून बोलावून घेतले. ती तातडीने साताऱ्यात आली. त्या दिवशी सायंकाळी रुक्साना हिने आपण गर्भवती असून, बाथरुमला जायचे आहे, असं सांगितले. त्यामुळे बागवान यांनी तिला घरात घेतले. यावेळी तिने हातचलाखी करून बागवान यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली. यानंतर दोघेही तेथून पसार झाले होते.