तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली - लक्ष्मण माने : उदयनराजेंच्या विधानाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 07:43 PM2018-11-02T19:43:18+5:302018-11-02T19:51:33+5:30
‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलताना ते नेहमीच जीभ सैल सोडतात,
सातारा : ‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलताना ते नेहमीच जीभ सैल सोडतात, आता जिल्ह्यातील तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका वंचित बहुजन महाआघाडीचे प्रवक्ते पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली.
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वंचित घटकातील उमेदवार उभा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. ‘साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत नेहमीच वादग्रस्त विधान करीत असतात. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी पुन्हा आपली जीभ सैल सोडली, याचा वंचित आघाडीतर्फे निषेध करण्यात येत आहे. उदयनराजे हे परंपरेने राजे झाले आहेत. साताऱ्यातील व महाराष्ट्रातील जनता तुम्हाला केवळ छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आला म्हणून मान देते. त्यामुळे तुमचे राजेपण टिकून आहे. बोलताना डोकं थंड ठेवा आणि विचार करून बोला.’
आरक्षण नको असं म्हणणाऱ्यांनी संपत्तीच्या समान वाटपाबाबतही संसदेत मुद्दा उपस्थित करावा. वंचितांचे प्रश्न अद्याप तसेच आहेत. तसेच त्यांना सत्तेतही स्थान नाही. प्रस्थापित पक्षांनी सरंजामदारांना सत्तेत आणण्याचे काम केले. त्यामुळे बहुजन समाज सत्तेपासून दूर राहिला आहे. राजे-महाराजांना आता घरी बसविण्यासाठी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले.