पुसेगाव : खटाव तालुक्यातील जांब येथे गंजीला लागलेल्या आगीत दोन हजार कडबा व शेतीपूरक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जांब येथील विठोबाचा माळ या ठिकाणी विश्वास शिंदे व कैलास शिंदे या भावांनी शेजारी-शेजारी नुकत्याच गंजी लावून ठेवल्या होत्या. ज्वारीची सुगी संपल्यानंतर येथील शेतकरी पावसाळ्यात जनावरांना चारा मिळण्यासाठी ज्वारीचा कडबा व गवताच्या गंजी लावून ठेवतात. मात्र, या गंजीला आग लागली. शिंदे कुटुंबातील महिलांना या गंजीतून धूर निघालेला दिसल्याने, त्यांनी लगेच आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना मदतीला बोलावून घेतले. त्यानंतर, शेतकऱ्यांनीही त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूला असलेल्या गोठ्यातून भांडे घेऊन पाणी आणण्यासाठी नजीकच्या हातपंपाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. एव्हाना दोन्हीही गंजींनी चांगलाच पेट घेतला होता.
लोकांच्या मदतीने शेजारच्या वस्तीत असलेल्या बोअरला पाइप जोडून गंजीवर पाण्याचा फवारा सुरू केला. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा आजूबाजूच्या वस्तीत आग पसरून मोठा अनर्थ घडला असता. या आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, आगीत वैरणीचे मोठे नुकसान झाले असून, सध्या जनावरांना खायला एकही पेंडी शिल्लक नाही. त्यामुळे जनावरांना खायला काय घालायचे, हा प्रश्न शिंदे कुटुंबीयांना पडला आहे. झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली आहे.
फोटो ओळ : खटाव तालुक्यातील जांब येथे गवताच्या गंजीला आग लागून मोठे नुकसान झाले. (छाया : केशव जाधव)