कुडाळ : शासनाच्या विविध योजना जावळी तालुक्याने आतापर्यंत प्रभावीपणे राबवून विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून आपल्या आदर्श कार्याचा ठसा उमटविला आहे. तर नुकताच जावळीने संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त केल्याबद्दल पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या ‘आत्मसन्मान’ कार्यक्रमात पंचायत समितीचा ‘सन्मान’ करीत मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते राज्यपुरस्कार देण्यात आला.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच सभापती सुहास गिरी, गटविकास अधिकारी गजानन भोसले, सर्व पदाधिकारी, अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामस्थ यांनी संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यानुसार तालुक्यातील १२६ गावांमधील २४ हजार ६६ कुटुंबे ही नियमितपणे शौचालयाचा वापर करीत असून संपूर्णपणे हागणदारीमुक्त आली आहेत.या योजनेत पंचायत समितीने गेली १०० वर्षे सातत्य ठेवल्यामुळे राज्यातील आठ पंचायत समितींना राज्य शासनाने पुरस्कारदेऊन गौरव केला.हा पुरस्कार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तसेच राजेशकुमार, राष्ट्रीय पेयजल सहसचिव सरस्वती प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन के. पाटील, चंद्रशेखर जगताप यांच्या उपस्थितीत सभापती सुहास गिरी, गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी स्वीकारला. (प्रतिनिधी)सर्वांच्या सहकार्यामुळेच हा आत्मसन्मान : गिरीपंचायत समिती सभापती म्हणून काम करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोेसले यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्यामुळेच पंचायत समितीत जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन हा पुरस्कार मिळविता आला. यापुढेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली व सर्व पंचायत समिती सदस्यांच्या, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने चांगले काम करीत राहणार असे मत सभापती गिरी यांनी व्यक्त केले.
‘आत्मसन्मान’ मध्ये जावळीकरांचा ‘सन्मान’
By admin | Published: October 14, 2015 11:04 PM