सातारा : कुरिअर बॉयचे अपहरण करून लूटमार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सैन्य दलातील एका जवानाचा समावेश असल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.राजेश विलास कांबळे, निखील प्रकाश वाघमळे (दोघे रा. अंबवडे (सं) ता. कोरेगाव) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. अजित विजय फाळके (रा. सातारा रोड) हा फरार असून, तो सध्या सैन्य दलात कार्यरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कुरिअर कंपनीत काम करणारे शैलेश सूर्यकांत भोकरे (रा. चिमणपुरा पेठ, सातारा) हे साताऱ्यातील उपनगरात नेहमीप्रमाणे कुरिअरची डिलिव्हरी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी निघाले होते.
दरम्यान, शहरातील एलबीएस कॉलेजजवळ फाळके, कांबळे, वाघमळे या तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडील एक घड्याळ व कुरिअरची काही पार्सल हिसकावली. दरम्यान, राजेश कांबळे याने भोकरे यांना त्यांच्याच दुचाकीवर जबरदस्तीने बसवून मल्हार पेठमार्गे करंजे पेठेत नेले. तेथील एका चिंचेच्या झाडाखाली त्यांनी दुचाकी थांबवली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या जवान फाळके व वाघमळे या दोघांनी भोकरे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन ते पसार झाले.स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला असता यामध्ये एका जवानाचा सहभाग असल्याचे समोर आले. मात्र, संबंधित जवान फाळके हा सध्या पोलिसांना सापडला नाही. त्याचे दोन्ही साथीदार कांबळे आणि वाघमळे या दोघांना मात्र पोलिसांनी अटक केली.जवानाचा शोधासाठी पथके रवाना..अजित फाळके हा सैन्य दलात गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहे. तो नुकताच सुटीवर आपल्या गावी आला आहे. मात्र मित्रांच्या संगतीने त्याने कुरिअर बॉयला लुटण्याचे तपासात समोर येत आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.