भेटीमागे केवळ भावना, दुसरा कसलाही रंग नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:26+5:302021-07-07T04:48:26+5:30
कऱ्हाड : वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यामुळेच संभाजी भिडे माझ्या भेटीला आले होते. त्यांनी त्यांच्या भावना आणि सहानभूती व्यक्त ...
कऱ्हाड : वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यामुळेच संभाजी भिडे माझ्या भेटीला आले होते. त्यांनी त्यांच्या भावना आणि सहानभूती व्यक्त केली. ती भावना आम्ही स्वीकारली असून, यापेक्षा वेगळा कसलाही रंग या भेटीला नाही, असे मत बंडातात्या कऱ्हाडकर यांनी व्यक्त केले.
कऱ्हाडातील निषेध मोर्चानंतर सोमवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी करवडी येथे स्थानबद्ध असलेल्या बंडातात्या कऱ्हाडकर यांची भेट घेतली. दोघांनी काहीवेळ चर्चा केली. यावेळी बंडातात्यांनी भिडे यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अल्पकाळ दोघांनीही मनोगत व्यक्त केल्यानंतर संभाजी भिडे यांच्यासह त्यांचे अनुयायी निघून गेले. या भेटीनंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
बंडातात्या कऱ्हाडकर म्हणाले, प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढले. मला करवडीत आणून २० जुलैपर्यंत स्थानबद्ध केले आहे. प्रशासनाने वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्याबद्दल सहानुभूती वाटणारे अनेकजण येथे येऊन भेटत आहेत. त्याच पद्धतीने हिंदुत्वावर काम करणारे आणि आक्रमक असणारे संभाजी भिडे गुरुजी येथे मला येऊन भेटले. ते केवळ औपचारिक भेटीसाठी आले होते. काही लोकांच्या मनात शंका येण्याची शक्यता आहे की, यांची ही भेट ठरलेलीच होती. एकमेकांच्या विचारानेच आले आहेत. मात्र, असे काहीही नाही. केवळ ही भेट औपचारिक होती. या भेटीवेळी गुरुजींनी शिदोरी म्हणून संदेश दिला. त्यामुळे यापेक्षा वेगळे काहीच नाही. वारकरी सांप्रदायाचे मूळ हिंदूच आहे. तसेच हा सांप्रदाय सर्वधर्म समभावाचाही आहे. त्यामुळे एका हिंदू संघटनेला वारकऱ्यांवर झालेला अन्याय सहन न झाल्यानेच शिवप्रतिष्ठानने त्यांची भावना, सहानुभूती व्यक्त केली आहे.
फोटो : ०५ केआरडी ०७
कॅप्शन : करवडी (ता. कऱ्हाड) येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध असलेल्या बंडातात्या कऱ्हाडकर यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भेट घेतली.