कऱ्हाड : सर्वसामान्यांचा विचार न करता लॉकडाऊन केले जात असून सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सतत लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. प्रशासनाने लॉकडाऊन मागे घ्यावा. अन्यथा, सर्वसामान्यांनी जगायचे कसे, याचे उत्तर द्यावे, असा सवाल कऱ्हाड तालुका दक्ष नागरिक संघ तसेच विविध व्यापारी संघटनांनी केला आहे.
लॉकडाऊनच्या विरोधात सोमवारी व्यापाऱ्यांसह सामाजिक संघटना एकवटल्या. प्रशासकीय इमारतीत जाऊन त्यांनी मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना सादर करण्यात दिले. लॉकडाऊन रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
कृष्णा कारखाना निवडणूक प्रक्रिया २ जुलैपर्यंत सुरू होती. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येत होते. जाहीर सभा, प्रचार, रॅली यांना शासनाने परवानगी दिली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला. याकडे शासनाने लक्ष दिले नाही. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपताच लॉकडाऊन लागू केला गेला. सर्वसामान्यांच्या हाताला सध्या काम नाही. त्यातच वाढती महागाई, कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, वीजबिल, विविध कर, कर्जाच्या वसुलीसाठी लोक रोज घरी येत आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लॉकडाऊनमुळे आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाने जीव गेलेला बरा, अशी वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. लॉकडाऊन करताना जनतेचा विचार न करता केवळ राजकारण्यांचा विचार केला जात असल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन रद्द करून व्यापाऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी केली आहे. त्यासाठी कोरोना नियमांचे पालन करून आजपासून दुकाने सुरू ठेवणार असल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असूून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बळीराजा शेतकरी संघटनेने व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
फोटो : ०५केआरडी०८
कॅप्शन : कऱ्हाडातील व्यापारी, सामाजिक संघटनांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून लॉकडाऊनला विरोध दर्शविला.