खटाव : येरळा नदी आणि रामाच्या ओढ्याच्या संगमावरील खातगुण, ता. खटाव येथील ब्रिटिशकालीन गज धरणाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने बारामतीतील गोविंदबाग येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. खासदार शरद पवार यांनी धरणाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून तातडीने पुनरुज्जीवन कामासाठी निधी मिळवून देतो, असे आश्वासन दिले आहे.
लवकरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांची बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे. धरणाच्या कामाला गती मिळेल अशी माहिती सरपंच अमिना सय्यद यांनी दिली. खातगुणच्या गज धरणाचे बांधकाम १८६७ मध्ये झाले आहे. १५० वर्षांपेक्षा जास्त दिवस धरणाला झाले आहेत. धरणाचे पूर्ण बांधकाम दगडी असून, लांबी ३०० मीटर, रुंदी सात फूट आणि उंची ३० फूट आहे. धरणाला दोन कालवे आहेत. उजवा कालवा २५ किलोमीटर, तर डावा कालवा १४ किलोमीटर लांबीचा आहे. धरणाच्या पाण्यावर जवळपास सतराशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. दुष्काळी भागासाठी हे धरण संजीवनी आहे. ब्रिटिश कंपनीने शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार करून धरणाची मुदत संपली आहे. यामुळे तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यानंतर धरणाची किरकोळ दुरुस्ती होत होती. परंतु सततचे महापूर आणि बांधकाम जीर्ण झाल्यामुळे धरणाच्या भिंतींना तडे जात आहेत. मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. धरणाची तातडीने दुरुस्ती केली नाही तर धरण फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती व पुनरुज्जीवन व्हावे ही ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार नवनिर्वाचित सदस्यांनी खासदार शरद पवारांची भेट घेऊन या कामासाठी सरकारकडे पाठपुरवठा करावा, अशी विनंती केली. खासदार शरद पवारांनी धरणाच्या वयामुळे झालेली स्थिती आणि दुष्काळी भागासाठी धरणाची असलेली गरज लक्षात घेऊन जलसंपदामंत्र्यांकडून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे, अशी माहिती ग्रामस्थ निखिल घाडगे यांनी दिली.
यावेळी सरपंच अमिना सय्यद, वसंत जाधव, श्यामराव भोसले, गजानन लावंड, प्रमोद भोसले, विवेक जाधव उपस्थित होते.
कॅप्शन :
खातगुणच्या ब्रिटिशकालीन गज धरणाचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात चर्चा करताना सरपंच आमिना सय्यद, वसंत जाधव, श्यामराव भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली.