किडगाव : सातारा तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या किडगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये किडगावमध्ये दुरंगी लढत पाहावयास मिळत आहे. दोन्ही पॅनेल सध्याच्या परिस्थितीत वैयक्तिक गाठीभेटींबरोबरच लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी प्रचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे.
किडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नऊ जागांसाठी होत आहे. यासाठी अठरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
गणेश विकास परिवर्तन पॅनेलकडून वाॅर्ड एकमधून निखिल रमेश घोलप, मनीषा गणेश लोहार, नंदा चंद्रकांत गायकवाड. वाॅर्ड दोनमधून जयवंत सुरेश टिळेकर, विक्रम रामचंद्र इंगवले व प्रमिला दत्तात्रय इंगवले. वाॅर्ड तीनमधून गौरव प्रदीप इंगवले, उषा रमेश इंगवले तसेच सुनीता विलास मेणकर हे उमेदवार नशीब आजमावत आहेत.
सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलकडून वाॅर्ड एकमधून राजहंस सूर्यकांत घोलप, अधिका चंद्रकांत टिळेकर, सविता रत्नदीप इंगवले. वाॅर्ड दोनमधून संतोष रामचंद्र टिळेकर, संतोष बापूराव इंगवले, शुभांगी नीलेश चोरगे. वाॅर्ड तीनमधून इंद्रजित आनंदराव ढेंबरे, शुभांगी संजय इंगवले, सोनाली किरण पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत.
निवडणुकीला काही दिवस शिल्लक असल्याने निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. सर्वत्र बॅनरबाजी होत असून, उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली जात आहे. वैयक्तिक गाठीभेटींवर प्रचारात मोठा भर दिला जात आहे. दोन्ही गट सातारच्या दोन्ही राजांना मानणारे असून, निवडणुकीत कोणतेही पॅनेल जिंकून आल्यास या ग्रामपंचायतीवर मात्र राजे गटाचे वर्चस्व असणार आहे.