कोरेगाव : एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शहरातील शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये दोन हजार रुपयांच्या १९ बनावट नोटा जमा करणाऱ्या संशयितास पोलिसांनी तातडीने हालचाल करत अटक केली. कोरेगावपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या वाडीतील तो रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलीस पथक त्याला घेऊन मुंबईला तपासासाठी रवाना झाले.
राष्ट्रीयीकृत बँकेच्या शहरातील शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये सोमवार, २९ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने स्वत:च्या खात्यावर दोन हजार रुपयांच्या १९ बनावट नोटा जमा केल्या होत्या. बँकेच्या तपासणीमध्ये या नोटा बनावट व एकाच सिरियलच्या असल्याचे निष्पन्न झाले होते. शाखाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निरीक्षक प्रभाकर मोरे व उपनिरीक्षक विशाल कदम यांना बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राथमिक तपासामध्ये युवकाचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार, ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर उपनिरीक्षक विशाल कदम यांचे पथक संशयिताला घेऊन तपासासाठी मुंबईला रवाना झाले.
चौकट :
मुंबईत गुन्ह्याचा केंद्रबिंदू!
संबंधित युवक हा कोरेगाव परिसरातील असला तरी लहानाचा मोठा मुंबईतच झाला आहे. त्याचे वास्तव्य जादा तर तेथेच असते. काही दिवसांपूर्वी तो गावाला आला होता. पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली असून, गुन्ह्याचा केंद्रबिंदू मुंबईच असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस पथक तेथे तळ ठोकून आहे.