कृष्णा कारखान्याच्या अध्यक्षांच्या चुलत भावाची आत्महत्या, घरातील कोचवर बसून स्वत:वर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 12:56 PM2018-03-25T12:56:08+5:302018-03-25T12:56:08+5:30
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या चुलत बंधूने राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.
सातारा - कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या चुलत बंधूने राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. विराज हिंदुराव मोहिते (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
रेठरे बुद्रुक येथील कोल्हेवाडी शिवारात मोहिते कुटुंबीयांचे घर आहे. शनिवारी रात्री विराज यांच्यासह त्यांचे बंधू व इतर कुटुंबीय घरामध्ये होते. विराज हे घराच्या हॉलमध्ये कोचवर बसले होते. रात्री दहाच्या सुमारास सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा आवाज झाला. त्यामुळे मोहिते कुटुंबीय हॉलमध्ये धावले. त्यावेळी विराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तत्काळ त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. विराज यांच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.