पोलिसांना टीप देण्याच्या संशयावरून कुकरीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:29 PM2019-02-13T18:29:12+5:302019-02-13T18:31:37+5:30
पोलिसांना टीप देतो, या संशयावरून भायज्या जमन्या भोसले (वय ३५, रा. आरफळ, ता. सातारा) याच्यावर तिघांनी कुकरी आणि चाकूने वार केले. यामध्ये भायज्या भोसले गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सातारा: पोलिसांना टीप देतो, या संशयावरून भायज्या जमन्या भोसले (वय ३५, रा. आरफळ, ता. सातारा) याच्यावर तिघांनी कुकरी आणि चाकूने वार केले. यामध्ये भायज्या भोसले गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शहज्या जमन्या भोसले, सूर्यकांत शहजा भोसले, मयूर शहजा भोसले (सर्व रा. आरफळ पो. वडूथ, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भायज्या भोसले हा रात्री साडेनऊच्या सुमारास आरफळ येथील संजय मदने यांच्या घरासमोरून चालत निघाला होता. यावेळी वरील आरोपींनी संगणमत करून भायज्याला अडवले. तू माझ्या जावयाची माहिती पोलिसांना का दिली, असे विचारून शहज्या भोसले याने कुकरीने डोक्यात वार केला. तसेच सूर्यकात भोसले आणि मयूर भोसले यांनी पाठीत चाकूने वार केले. यामध्ये भायज्या गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. भायज्याने फिर्याद दिल्यानंतर संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता घराला कुलूप लावून आरोपींनी पलायन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिक तपास हवालदार दीपक बर्गे हे करत आहेत.