अक्कलकोटच्या राजेंची कुर्लेत गादी
By admin | Published: March 17, 2015 11:03 PM2015-03-17T23:03:37+5:302015-03-18T00:04:20+5:30
राजाचे कुर्ले : संस्थानकालीन शिवालयाचा गिरिजाशंकर म्हणून लौकिक
राजीव पिसाळ -पुसेसावळी अक्कलकोट येथून तुळजाजी भोसले यांनी १७५८ मध्ये खटाव तालुक्यातील कुर्ले येथे गादी स्थापन केली, तेव्हापासून कुर्ले गावाची ओळख ‘राजाचे कुर्ले’ अशी झाली. स्वतंत्र संस्थान म्हणूनही राजाचे कुर्लेचा लौकिक आहे.
तुळजाजी भोसले यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजीराजे गादीवर बसले. काही दिवसांनंतर काही बेलदार समाजातील लोक इमारतीसाठी लागणारा दगड काढण्यासाठी पठारावर गेले असता त्यांच्या पारेला रक्त लागले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाजवळ कथन केला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एक स्वयंभू पिंड सापडली. त्या जागेवर शिवाजीराजे भोसले यांनी शिवालय बांधले. तेच सध्याचे गिरिजाशंकर मंदिर म्हणून प्रसिद्ध देवस्थान झाले आहे.
देवालयाचा गाभारा व मंडप पूर्णपणे दगडाने बांधला होता. बाहेरचा मंडप हा लाकडी होता. सध्याचे संग्रामसिंहराजे भोसले व समरजितराजे भोसले यांच्या पणजी सरस्वतीबाई राजे भोसले यांनी तो लाकडी मंडप काढून त्या ठिकाणी जर्मनहून लोखंड व पत्रे आणून सद्याचा सभामंडप बांधला. संस्थान विलीन होण्याअगोदर राजवाड्यात अनेक महोत्सव साजरे होत असते.
दसऱ्याच्या दिवशी राजवाड्यासमोर आपट्याच्या पानांचे पूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम होत असे. गावात प्रामुख्याने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गिरिजाशंकर मंदिरासमोर यात्रा भरते. परंतु गिरिजाशंकरवाडी व राजाचे कुर्ले या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यामुळे गिरिजाशंकरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी यात्रा भरविली जाऊ लागली. तर कुर्ले ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीस यात्रा भरते. या यात्रेच्या वेळेस कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले जाते. नामांकित मल्ल यात सहभागी होतात.
महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता शिवलिंगापासून ते बाहेरच्या दरवाजापर्यंत लाखो रुपयांचा कापूर आरती झाल्यानंतर जाळला जातो. गावात संस्थान काळातील गणपतीचे मंदिर आहे. ग्रामदैवत म्हणून धाकुबाईचे मंदिर आहे. श्रावणातील नागपंचमी दिवशी धाकुबाई देवीच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढली जाते. त्याच दिवशी सप्ताह सुरू होऊन दररोज कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतात. सातव्या दिवशी त्याची सांगता केली जाते.