सातारा : येथील देगाव फाट्यावरील हेल्थ क्लबमध्ये घुसून पाच ते सहा युवकांनी तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. यामध्ये हेल्थ क्लबचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विकी जगताप, सागर जगताप, अक्षय गोगावले, शशिकांत ननावरे यांच्यासह अन्य दोन अनोळखी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचा फिर्यादी जन्नत काझी (वय २९, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांच्या हेल्थ क्लबसमोर डान्स क्लास आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जन्नत काझी यांच्या क्लबसमोरील वर्कशॉपचा बॅनर फाडण्यात आला होता.
हा बॅनर कुणी फाडला, याची माहिती घेण्यासाठी हेल्थ क्लबमधील सीसीटीव्ही तपासले असता वरील संशयितांनी बॅनर फाडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आमचा बॅनर का फाडला, अशी विचारणा केल्याच्या रागातून सर्वजण हेल्थ क्लबमध्ये घुसले. दरवाजाला कडी घालून हेल्थ क्लबमधील दोन मोठे आरसे, दोन प्लास्टिकच्या खुर्च्या, टीव्ही, लॅपटॉप, काचेचे कपाट, म्युझीक सिस्टिम, काचेचा दरवाजा आदी साहित्याची तोडफोड केली. तसेच क्लासमधील मुलींना परत क्लासमध्ये यायचे नाही. आला तर तुमचे काही खरं नाही, अशी शिवीगाळ व दमदाटी त्यांनी केली. कोरिओग्राफर शिवम निकम, ओंकार मोरे, प्रतीक धनावडे यांनाही वरील पाचजणांनी मारहाण केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. या प्रकारानंतर काझी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पूनम विकास जगताप (वय २३, रा. देगाव फाटा, सातारा) हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजता ओंकार जयवंत मोरे, प्रतीक नंदकुमार धनवडे (रा. अदालतवाडा परिसर), शिवम निकम (रा. अहिरे कॉलनी सातारा), प्रतीक बर्गे (रा. अमरलक्ष्मी बसस्टॉप, कोडोली) यांनी शशिकांत ननावरे (रा. देगाव), अक्षय गोगावले (रा. अमरलक्ष्मी) यांना लोखंडी गजाने मारहाण केली. शशिकांतच्या डोक्यास व अक्षयच्या हातास गंभीर दुखापत केली. तसेच विकास जगताप यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.