सातारा : स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत सायन्स व इंजिनिअरिंग संशोधन बोर्डामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला.
या पुरस्कारासाठी विज्ञान, तंत्रज्ञान या विषयात मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणाºया ३५ वर्षांच्या आतील संशोधकांना हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ. गौरव लोहार यांनी सादर केलेल्या ‘सुपर कपेसिटर आणि बायोसेन्सर’ या विषयावरील संशोधन प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी शासनाकडून बावीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
डॉ. गौरव लोहार हे मूळचे वारुंजी, ता. कºहाड येथील असून, यापूर्वी त्यांचे चाळीस आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्या संशोधनासाठी त्यांनी स्वामित्व हक्क (पेटंट) साठी प्रस्ताव दाखल केला आहे.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी कौतुक केले. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. व्ही. जे. फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी शासनाने जाहीर केलेल्या निधीपैकी साडेदहा लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.- डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य, एलबीएस कॉलेज, सातारा