याबाबतची फिर्याद सविता सुधीर पाटील (वय ४१, रा. वारूंजी-विमानतळ, ता. कऱ्हाड) यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुंजी-विमानतळ येथील सविता पाटील यांच्या नातेवाईकाचा साखरपुड्याचा कार्यक्रम रविवारी शहरातील पंकज हॉटेलमध्ये होता. सविता पाटील या दुचाकीवरून त्यांच्या मुलासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या व ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजा साळुंखे हिने सविता यांच्याजवळ तिच्या भावाची जुनी अंगठी पर्समध्ये ठेवायला दिली. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्यासुमारास सविता पाटील यांनी त्यांची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवून फोटो काढण्यासाठी गेल्या. फोटो काढून झाल्यानंतर पर्स घेण्यासाठी त्या गेल्या असता, पर्स त्याठिकाणी दिसली नाही. पर्सबाबत पाटील यांनी पाहुण्यांना विचारणा केली असता, त्यांनी काही माहिती नसल्याबाबत सांगितले. पर्स चोरून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर सविता पाटील यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसात दिली. चोरीस गेलेल्या पर्समध्ये ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या सहा बांगड्या, ३५ हजार रुपये किमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, २५ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची अंगठी असा ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज होता. पोलीस उपनिरीक्षक स्वामी तपास करीत आहेत.
साखरपुड्याच्या कार्यक्रमातून चौदा तोळ्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:59 AM