सातारा नगरपालिकेत झिरो पेंडन्सी अंतिम टप्प्यात, जुन्या कागदपत्रांची वर्गवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:06 PM2017-11-17T17:06:01+5:302017-11-17T17:10:42+5:30
सातारा पालिकेत गेल्या एक महिन्यापासून झिरो पेंडन्सी अंतर्गत सुरू असलेले अभिलेखे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांची वर्गवारी केल्याने पालिकेतील सर्वच विभागांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
सातारा : पालिकेत गेल्या एक महिन्यापासून झिरो पेंडन्सी अंतर्गत सुरू असलेले अभिलेखे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांची वर्गवारी केल्याने पालिकेतील सर्वच विभागांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व नंगरपंचायतींमध्ये झिरो पेंडन्सी मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सातारा पालिकेतही महिन्यापासून ही मोहीम सुरू असून, आतापर्यंत सुमारे १५ टन रद्दी बाहेर काढण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत तीस वर्षांपूर्वीची, वीस वर्षांपूर्वीची व दहा वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा यासह सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचारी झिरो पेंडन्सीच्या कामात व्यस्त आहे.
जवळपास हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मोहिमेमुळे पालिकेच्या कामकाजात गतिमानता येणार असून, नागरिकांनाही जलद सुविधा उपलब्ध होणार आहे.